‘सकाळ रिलीफ फंडा’ची कामे प्रगतिपथावर

Sakal-Relief-Fund
Sakal-Relief-Fund

पुणे - ‘सकाळ’च्या विश्‍वासार्हतेवर सहभागाची मोहोर उठवणाऱ्या ‘सकाळ’च्या वाचकांनी दिलेल्या मदतीच्या पाठबळावर ‘सकाळ रिलीफ फंडा’ने हाती घेतलेली विविध कामे प्रगतिपथावर असून, पुणे जिल्ह्यातील माळीण गावाच्या परिसरातील आदिवासी मुलांसाठी बांधण्यात येत असलेल्या वसतिगृहात येत्या शैक्षणिक वर्षापासून या परिसरातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गांत शिक्षण घेत असलेल्या गरीब व गरजू मुलांच्या निवासाची सोय होणार आहे. तसेच, दुष्काळ आणि पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या महाराष्ट्राच्या विविध भागांमधील ओढे, नाले, तलावांतील गाळ काढण्याच्या मोहिमेत आतापर्यंत ५८८ गावांमध्ये अतिरिक्त साठवण क्षमता निर्माण झाली असून, राज्यातील आणखी ५५ गावांचे प्रस्ताव विचाराधीन आहेत. प्रचंड पाऊस आणि पुरामुळे उद्‌ध्वस्त झालेल्या केरळ राज्याच्या दुर्गम भागातील दोन शाळांचे पुनर्निर्माणही ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे वाचकांनी जमा केलेल्या मदतनिधीतून होणार आहे. 

जुलै २०१४ मध्ये डोंगर खचून पुणे जिल्ह्यातील माळीण (ता. आंबेगाव) गाव उद्‌ध्वस्त झाले होते. दुर्घटनाग्रस्त माळीणसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’ने वाचकांना मदत देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जमा झालेल्या निधीतून परिसरातील आदिवासी मुलांसाठी वसतिगृह बांधले जात आहे. माळीण परिसरात जमीन खचण्याचा धोका असल्याने हे वसतिगृह घोडेगाव येथे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या वसतिगृहाची सात हजार चौरस फूट क्षेत्रफळाची दुमजली इमारत परिसरातील आदिवासी मुलांना शिक्षणासाठी वरदान ठरणार आहे. घोडेगाव येथील ‘आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ’ या शिक्षण संस्थेने वसतिगृह बांधकामासाठी जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. 

मराठवाडा, विदर्भासह राज्यातल्या सर्व विभागांमध्ये एप्रिल २०१३ पासून गावकऱ्यांच्या सहभागातून ओढे, नाले, तलावांतील गाळ काढण्याचे कामे होत आहेत. ‘सकाळ रिलीफ फंडा’तून मिळालेल्या मदतीच्या जोडीला लोकवर्गणी, श्रमदान आणि यंत्रसामग्रीसह इंधनाची मदत उभी करत या गावांतील रहिवाशांनी ‘भगीरथाचा वारसा’ जागवला आहे. या सर्व कामांमध्ये झालेल्या श्रमदानात ‘सकाळ’च्या तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियानाच्या सदस्यांचा मोलाचा वाटा आहे. 

पावसाचे प्रमाण कमी होत असताना पावसाच्या पाण्याचा थेंब न्‌ थेंब जमिनीत मुरविणे, जलस्रोत बळकट करणे, भूजलपातळी वाढण्यासाठी उपाययोजना करणे आणि जलसंधारणाच्या कामात सरकारी यंत्रणांबरोबर लोकांचा सहभाग वाढविणे, हे सूत्र घेऊन ही कामे होत आहेत. 

टंचाईग्रस्त गावांना पाण्याचा शाश्‍वत व विनाखर्चिक आधार देण्याऱ्या ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या या मोहिमेमुळे अनेक गावांतील दुर्लक्षित नद्या, नाले, ओढे आणि तलावांनी मोकळा श्‍वास घेतला आहे. पाण्याच्या या पारंपरिक स्रोतांना संजीवनी मिळत असतानाच या सगळ्या गावांना हक्काची साठवणक्षमताही मिळाली आहे. 

पुराचा तडाखा बसलेल्या केरळच्या मदतीसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’द्वारे निधी संकलन करण्यात आल्यानंतर पूरग्रस्तांना नेमक्‍या कोणत्या मदतीची गरज आहे, याची फंडाच्या वतीने पाहणी करण्यात आली होती. फंडाच्या सदस्यांनी ‘भूमिका ट्रस्ट’ या स्थानिक स्वयंसेवी संस्थेबरोबर काम करून केरळच्या दुर्गम भागातील दोन शाळांचे पुनर्निर्माण करण्याचे ठरवले आहे. 
‘सकाळ रिलीफ फंडा’ने अलीकडच्या काळात ‘आपलं घर’ ही नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथील शाळा, तसेच सुनामीनंतर अंदमान-निकोबार येथे केलेल्या मदतीबरोबरच, काश्‍मीर खोऱ्यामध्ये पाच रुग्णवाहिका देण्याचा उपक्रम व तेथील काही शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्यासाठी २०० संगणक देणे आदी उपक्रमही हाती घेतले होते. 

- जलस्रोत बळकटीकरणाच्या निमित्ताने गावागावांतील ग्रामस्थ पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एकवटले. 
- १९७२ च्या दुष्काळात बांधलेल्या पाझर तलावांना नवजीवन. 
- दर वर्षी बंधारे व ओढे लोकसहभागातून ‘रिचार्ज’ करण्याचे अनेक गावांचे नियोजन. 
- माळीण वसतिगृह ठरणार आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वरदान 
- पुराचा तडाखा बसलेल्या केरळच्या दुर्गम भागातील दोन शाळांचे पुनर्निर्माण होणार 

आपणही करा मदत!
पाणीटंचाईशी सामना करावा लागणाऱ्या गावांमध्ये होत असलेली जलसंधारणाची कामे, तसेच पुनर्निर्माणाच्या अन्य कामांसाठी आपणही हातभार लावू शकता. आपण रोख किंवा धनादेशाद्वारे मदत पाठवू शकता. धनादेश ‘सकाळ रिलीफ फंड’ या नावे काढावा. मदत पाठविण्याचा पत्ता ः  १) सकाळ रिलीफ फंड, द्वारा-सकाळ, ५९५ बुधवार पेठ, पुणे ४११००२. (दूरध्वनी क्र.-०२०-२४४०५५००).  २) सकाळ, प्लॉट नं. २७, नरवीर तानाजीवाडी, पीएमपीएल बस डेपोजवळ, शिवाजीनगर, पुणे ४११००५. (दूरध्वनी क्र.-०२०-२५६०२१०० किंवा ८६०५०१७३६६) ‘सकाळ रिलीफ फंडा’ला ऑनलाइन मदत देण्यासाठी आयडीबीआय बॅंकेच्या बुधवार पेठ, पुणे येथील शाखेतील 45910010013026 या क्रमांकाच्या खात्यात आपल्या मदतीची रक्कम ट्रान्स्फर करावी. बॅंकेचा आयएफएस कोड - IBKL0000459

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com