खाकरा, मिठाई अन्‌ ड्रायफ्रूट्‌स

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

कधी आणि कोठे...
कालावधी ः रविवारपर्यंत (ता. 29)
वेळ ः सकाळी अकरा ते रात्री नऊ
स्थळ ः कृषी महाविद्यालय मैदान, सिंचननगर जवळ, रेंजहिल्स
प्रवेश आणि पार्किंग मोफत

पुणे - गुजराती खाकरा-ढोकळा, केरळचा हलवा, राजस्थानी मिठाई अन्‌ महाराष्ट्राचे चमचमीत फराळ, अशा लज्जतदार पदार्थांचा आस्वाद खवय्यांनी "सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल'मध्ये बुधवारी घेतला. विविध प्रकारांतील लोणची, पापड, चटण्या आणि पटकन तयार होणारे (रेडी टू इट) खाद्यपदार्थ पुणेकरांनी खरेदी केले. या प्रदर्शनामध्ये उपमा, इडली, पावभाजी, भाजणी आणि रवा यांच्या तयार पिठाच्या जोडीला मसाले, सूप आणि लोणच्यातील विविध व्हरायटीही पाहता येतील.

उन्हाळ्यात सरबत तयार करण्यासाठी लागणारे वेगवेगळे फ्लेव्हर्स, आइस्क्रीम आणि मिल्क शेकसाठीचे विविध फ्लेव्हर्सही येथे उपलब्ध आहेत. त्या जोडीला फराळ, ड्रायफ्रूट्‌स, मिठाई आणि चिक्कीचा गोडवाही नागरिकांना चाखता येईल. लज्जतदार, खमंग आणि गोड पदार्थांचा मिलाफ या ठिकाणी पाहायला मिळेल. मिठाईच्या गोडव्यासह महाराष्ट्रीय थाळी, चिकन मसाला आणि अंडा भुर्जीची लज्जतही घेता येईल. चकली, चिवडा, बाकरवडी, चणाचोर गरम आणि लाडूचे विविध फ्लेव्हर्समध्ये उपलब्ध आहेत.

प्रदर्शनात आवळा कॅंडी, सोप, सुपारी व पानही खवय्यांसाठी उपलब्ध आहे. यासोबतच विविध प्रकारचे ज्यूस, जलजिरा ही पेयही आहेत. फराळी मिठा, चिक्की आणि लोणच्याचे प्रकारही पाहता येईल. चाटमध्ये पाणीपुरी, भेळ, शेवपुरी, रगडापुरी, तर मांसाहारी खवय्यांना नॉनव्हेजच्या विविध प्रकारांचा कॅफेटेरियामध्ये आस्वाद घेता येईल. फराळ, इटालियन फूड, राजस्थानी मिठाई आणि गुजराती फराळांसह विविध फ्लेव्हर्सचे येथे उपलब्ध असून, खाद्यपदार्थांची अनोखी खाद्यजत्रा येथे अनुभवता येईल.

Web Title: sakal shopping festival