आत्मविश्‍वासाने परीक्षेला सामोरे जा

वानवडी - महात्मा फुले सभागृह येथे ‘सकाळ’ आयोजित दहावी अभ्यासमाला कार्यशाळा.
वानवडी - महात्मा फुले सभागृह येथे ‘सकाळ’ आयोजित दहावी अभ्यासमाला कार्यशाळा.

घोरपडी - बदलत्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेची भीती न बाळगता त्याला आत्मविश्‍वासाने कसे सामोरे जावे, शेवटच्या टप्प्यात विषयांची उजळणी कशी करावी, याबाबतचे मार्गदर्शन शिक्षणतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना केले.

‘सकाळ’च्या वतीने ‘दहावी परीक्षेला सामोरे जाताना’ या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेल्या कार्यशाळेला परिसरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी मोठी गर्दी केली होती. कार्यशाळेमध्ये ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल देशमुख, डॉ. उमेश प्रधान, शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत, भाषा अभ्यासक व समुपदेशक स्नेहा जोशी यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी बोलताना राऊत म्हणाल्या, नवीन परीक्षा पद्धत सोपी आहे. अभ्यास करणारा कोणीही नापास होणार नाही. फक्त पाठांतरावर अवलंबून न राहता, तुम्हाला संबंधित विषयाचे किती ज्ञान मिळाले, यावर परीक्षेत भर असेल. तेव्हा भीती बाळगू नका तसेच परीक्षेचे दडपण घेऊ नका. भाषा अभ्यासक स्नेहा जोशी म्हणाल्या की, आकलन कृती आणि व्याकरण कृती याचा अभ्यास करा.

उत्तरपत्रिका लिहिताना काळजीपूर्वक लिहा. स्वतःचे मत लिहिताना विचार करून लिहा. कोणत्या शब्दात मांडले त्याला गुण आहेत. किती लिहिता यापेक्षा किती समर्पक लिहिता याला जास्त महत्त्व आहे. या कार्यशाळेचे आयोजन वितरण व्यवस्थापक घनश्‍याम जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. विभागाचे संदीप वाघ आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शिंदे यांनी केले.

‘सकाळ’ने भावी पिढीचे भविष्य घडविले - प्रधान
उमेश प्रधान म्हणाले, ‘सकाळ’ने दररोज अर्धे पान हे भावी पिढीचे भवितव्य घडवण्यासाठी दिले. ज्या विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’मधील सदर वाचले असेल त्यांना खूप फायदा होईल. पाठांतरापेक्षा आकलनावर भर द्या. भाषेतील छोट्या छोट्या चुका टाळा. उजळणी करताना ‘सकाळ दहावी अभ्यासक्रम’चा नक्की वापर करा. त्यामुळे परीक्षेची तयारी करणे सोपे जाईल. 

‘सकाळ’कडून सातत्याने उत्तम मार्गदर्शन - देशमुख
अ. ल. देशमुख म्हणाले, बदलता अभ्यासक्रम हा गुणवत्तेनुसार गुण मिळावेत या अनुषंगाने तयार केला आहे. प्रश्नपत्रिका नाही तर कृतिपत्रिका आहे. त्यानुसार समजून अभ्यास करा, काही नवीन प्रश्न आहेत. तेव्हा गटचर्चेने प्रश्नपत्रिका सोडवा. नवीन परीक्षा पद्धतीकडे ‘सकाळ’ने सातत्याने गांभीर्याने पाहिले आणि दैनिकाच्या माध्यमातून वेळोवेळी उत्तमरीत्या मार्गदर्शन केले आहे. त्याबद्दल ‘सकाळ’चे विशेष आभार.

नवीन परीक्षा पद्धतीबाबत पहिल्यांदाच इतकी सखोल माहिती मिळाली. शाळेतसुद्धा त्याबद्दल माहिती दिली नव्हती, त्यामुळे आता परीक्षेचा ताण कमी झाला आहे. 
- अदिती बनकर, विद्यार्थिनी

या कार्यशाळेमध्ये पेपर कसा सोडवायचा हे शिकायला मिळाले. वेळेची बचत, परीक्षेची इतर तयारी, गटचर्चा कशी करावी, अशा नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. 
- राजीव यादव, विद्यार्थी

चांगला उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना कमी वेळात जास्त गुण मिळवण्यासाठी मार्गदर्शन मिळाले. ‘सकाळ’चे आभार. 
- शीतल पाटील, शिक्षिका, गिरमे विद्यालय, वानवडी

कार्यशाळा खूप आवडली. अनेक समस्या दूर झाल्या. अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन मिळाले. मुलांना समजेल अशा भाषेत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. ‘सकाळ’चे विशेष आभार. यामुळे आमच्या मुलांची भीती कमी होण्यास मदत झाली. 
- उषा हळदणकर, पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com