
आपल्या स्वतःचे हक्काचे घर असणे हे अनेकांचे स्वप्न असते. कुणी या स्वप्नांच्या दिशेने निघालेले असते तर कुणी हे स्वप्न कवेत घेण्यासाठी सज्ज झालेले असते.
भावी घरमालकांची पावले वळली महालक्ष्मी लॉन्सकडे
पुणे - आपल्या स्वतःचे हक्काचे घर असणे हे अनेकांचे स्वप्न असते. कुणी या स्वप्नांच्या दिशेने निघालेले असते तर कुणी हे स्वप्न कवेत घेण्यासाठी सज्ज झालेले असते. डोक्यात बजेटचे गणित आणि मनात घराचे स्वप्न घेऊन अनेक पुणेकरांची पावले महालक्ष्मी लॉनच्या दिशेने वळाली. निमित्त होते सकाळच्या वास्तू प्रॉपर्टी एक्स्पोचे.
पुणेकरांना विविध भागांतील घराविषयीची माहिती एकाच छताखाली मिळत असल्याने त्यांची चांगली सोय एक्स्पोच्या निमित्ताने झाली. त्यामुळे कुणी आपल्या आई वडिलांना घेऊन तर कुणी आपल्या होणाऱ्या पत्नीला सोबत घेऊन एक्स्पोमध्ये सहभागी झाले होते. चाळीसहून अधिक स्टॉल या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. शहराच्या मध्य भागापासून चारही दिशांत कार्यरत असलेल्या नामवंत बिल्डर्सचे स्टॉल प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. आपल्याला कोणत्या भागात घर घ्यायचे आहे हे ठरवून नागरिक त्या-त्या भागातील स्टॉलवर जाऊन माहिती घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळाला.
दोन महिन्यांची चिमुकली आली प्रदर्शनाला
स्नेहल व सौरव बजाज हे बेंगळुरूस्थित दांपत्य. ते आपल्या दोन महिन्यांच्या मुलीसह प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते. ते दोघेही आयटीमध्ये नोकरीस आहेत. येत्या काही महिन्यांत ते पुण्याला शिफ्ट होणार आहेत. त्यासाठी ते घर घेण्यास इच्छुक आहेत. घराविषयी चांगली माहिती मिळावी या हेतूने त्यांनी एक्स्पोला भेट दिली. या वेळी त्यांच्याबरोबर त्यांची दोन महिन्यांची कन्या अविरादेखील होती. एक्स्पोमुळे घराची निवड सोपी झाल्याचे त्यांनी सांगितले.
एक्स्पोचा हॉल वातानुकूलित
सध्या शहरात उन्हाची काहिली मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एक्स्पोत आलेल्या नागरिकांना वाढत्या उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी एक्स्पोच्या ठिकाणी असलेला हॉल हा पूर्णपणे वातानुकूलित करण्यात आला आहे. त्यामुळेच स्नेहल व सौरव हे दांपत्य त्यांच्या दोन महिन्यांचा मुलीला एक्स्पोमध्ये घेऊन येऊ शकले. यासह नागरिकांसाठी मोफत पार्किंगसाठीची पुरेशी जागा प्रदर्शनाच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.