'ट्रान्सपोर्ट हब'साठी साखर संकुलचा रस्ता होणार मोठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakhar Sankul
'ट्रान्सपोर्ट हब'साठी साखर संकुलचा रस्ता होणार मोठा

'ट्रान्सपोर्ट हब'साठी साखर संकुलचा रस्ता होणार मोठा

पुणे : शिवाजीनगर येथे विकसीत होणार्या मल्टी माॅडेल ट्रान्सपोर्ट हबमुळे(Multi modal transport hub) या भागात दिवसरात्र वाहनांची वर्दळ आणखी वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गणेशखिंड रस्ता ते साखर संकुल (Sakhar Sankul) या दरम्यानचा के. बी. जोशी पथ ३० मीटरपर्यंत रुंद केला जाणार आहे. यासाठी शासकीय तसेच खासगी मालकांची जागा अधिग्रहण करण्यासाठी प्रशासनाने चर्चा सुरू केली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे यासंदर्भात शुक्रवारी (ता.१४) बैठक झाली. स्वारगेट ते पिंपरी चिंचवड(Swargate to Pimpri Chinchwad) या मेट्रो (Metro)मार्गिकेचे शिवाजीनगर येथे भूमिगत स्टेशनचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. हे काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन महामेट्रोचे आहे.

हेही वाचा: कोरोना होम टेस्टमध्ये 3549 पॉझिटिव्ह - किशोरी पेडणेकर

तसेच मेट्रोच्या कामामुळे एसटी स्थानक वाकडेवाडी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. शिवाजीनगर येथील भूमिगत मेट्रो स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर एसटी स्थानक बांधून दिले जाणार आहे. मेट्रो सुरू होतानाच या भागात रोज शेकडो एसटी बसची वाहतूक देखील सुरू होणार आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू झाले असून, पुढील साडे तीन वर्षांत या दोन्ही मेट्रो मार्गांचे काम पूर्ण होऊन तेथून प्रवासी वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच पुणे स्टेशनवरील भार कमी करण्यासाठी शिवाजीनगर येथून गाड्या सोडल्या जाणार आहेत. शिवाजीनगर येथून लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुरू झाल्यानंतर या भागात वर्दळ वाढणार आहे. तर, पीएमटीचा नरवीर तानाजी वाडी डेपो याठिकाणी आहे. त्यामुळे या परिसरात वाहनांची संख्या, प्रवासी संख्या वाढणार असल्याने त्यासाठीचे नियोजन महापालिकेने आत्तापासून सुरू केले आहे.

हेही वाचा: UP निवडणुकांसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, योगींचा मतदारसंघ ठरला

शुक्रवारी महापालिकेला आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत काही खासगी जागा मालक व शासकीय विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. खासगी मालकांनी ३० मीटर रूंदीपेक्षा २४ मीटर रूंदीकरण करावे किंवा संपूर्ण रस्ता रूंदी शासकीय जागेतून करावी अशी भूमिका घेतली आहे. मात्र, खासगी जागांमधील केवळ फ्रंट मार्जिनच अधिग्रहण करावे लागेल असा मुद्दाही बैठकीत समोर आला. या बैठकीत तोडगा निघालेला नसून, जागा पाहणी करून अजून बैठका झाल्यानंतर यामध्ये मार्ग निघेल. पण मेट्रोचे काम पूर्ण होण्याच्या पूर्वी ही रस्ता मोठा करावा लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शासकीय जमिनीमुळे लवकर तोडगा शक्य

आकाशवाणी ते साखर संकुल हा रस्ता सध्या २४ मीटर असून, २०१७च्या विकास आराखड्यात ही तो २४ मीटरच असल्याने त्याचे रूंदीकरण केले जाणार नाही. मात्र, साखर संकुल ते कृषी महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारापर्यंत म्हणजेच के. बी. जोशी रस्ता सध्या १६ मीटर रुंद आहे. तो विकास आराखड्यात ३० मीटर दर्शविण्यात आला आहे. हा रस्ता सुमारे ५०० मीटर लांबीचा आहे. त्याच्या एका बाजूला साखर संकुल ते कृषी महाविद्यालय या दरम्यान सर्व जागा राज्य शासनाची आहे. तर दुसऱ्या बाजूला काही जागा पीएमटीची तर उर्वरित खासगी जागा आहेत. या रस्त्याची रूंदी १४ मीटरने वाढणार असल्याने दोन्ही बाजूला प्रत्येकी सुमारे ७ मीटरचे भूसंपादन महापालिकेला करावे लागणार आहे. एका बाजूला शासकीय जमीन असल्याने त्यावर लवकर तोडगा निघू शकतो असे अधिकार्यांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top