esakal | पुणे महानगरपालिकेच्या १५५० कंत्राटी सुरक्षारक्षक कर्मचार्यांचे वेतन रखडले | Security Salary
sakal

बोलून बातमी शोधा

Madhav Jagtap
पुणे महानगरपालिकेच्या १५५० कंत्राटी सुरक्षारक्षक कर्मचार्यांचे वेतन रखडले

पुणे महानगरपालिकेच्या १५५० कंत्राटी सुरक्षारक्षक कर्मचार्यांचे वेतन रखडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विश्रांतवाडी - पुणे महानगरपालिकेच्या १५५० कंत्राटी सुरक्षारक्षक कर्मचार्यांचे जुलै महिन्याचे अर्धे व त्यानंतरचे वेतन झाले नसल्याने त्यांच्यासमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत.

पुणे महानगरपालिकेने १५५० पुरुष आणि महिलांची कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक कर्मचारी म्हणुन पालिकेतील विविध विभागांमध्ये नेमणूक केली आहे. कोविड सेंटर, क्षेत्रीय कार्यालये, पालिकेची उद्याने अशा विविध ठिकाणी या सर्वांची नियुक्ती केलेली आहे. मर्जीतील ठेकेदारास हे कंत्राट मिळावे म्हणुन सत्ताधारी भाजपाने नियमांना बगल देत हा ठेका क्रिस्टेल प्रायव्हेट लिमिटेड (मुंबई ) या वादग्रस्त कंपनीस मिळवून दिला. या आधी "सैनिक प्रायव्हेट लिमिटेड (मुंबई) कंपनी या कंत्राटी सुरक्षारक्षकांचे वेतन करीत होते. परंतु त्यांच्याही अनियमित कारभारामुळे त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले, परंतु केलेल्या कामापोटी देण्यात येणारे वेतन म्हणजेच जुलै महिन्याचे अर्धे वेतन आणि संपूर्ण ऑगस्ट महिन्याचा संपूर्ण पगार दिला गेलेला नाही. त्यानंतर नवीन ठेकेदारानेसुद्धा या सर्व कंत्राटी कामगारांचे सप्टेंबर महिन्याचे पगार दिले नाहीत.

हेही वाचा: Pune : सिंहगड एक्सप्रेस सोमवारपासून धावणार

आज जवळपास अर्धा ऑक्टोबर महिना उलटून गेला आहे, परंतु अजूनही हे सर्व कंत्राटी सुरक्षा कर्मचारी पगाराची वाट पाहत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात आणि नवरात्रौसारख्या महिलांच्या उत्सावात काही कर्मचार्यांना स्वतःचे दागिने गहाण ठेवून उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे. येणारे दिवस हे सणासुदीचे असून या सर्व १५५० कंत्राटी सुरक्षारक्षक कर्मचारी वर्गाचे दसरा आणि दिवाळी गोड होणार की अंधारात जाणार हा यक्ष प्रश्न त्यांच्या कुटुंबासमोर उपस्थित झाला आहे.

या सर्व कंत्राटी सुरक्षारक्षक कर्मचार्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांशी संपर्क साधून या अडचणीच्या प्रश्नांतून मार्ग काढण्याची विनंती केली. याप्रश्नांची गांभीर्याने दखल घेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शहर प्रवक्ते प्रदिप देशमुख आणि शहर सरचिटणीस विनोद पवार यांनी पालिका उपायुक्त माधव जगताप यांना निवेदन दिले. यावेळी २ दिवसांत सर्वांचे पगार काढण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले, जर या सर्वांचे वेतन जमा न झाल्यास आयुक्तांच्या दालनाबाहेर धरणे आंदोलन करण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसने इशारा दिला आहे. याप्रसंगी विजय देसाई, श्रीनिवास मेखला, नचिकेत साळवी, आनंद हंगरगे, सचिन शिंदे हे कार्यकर्ते आणि कंत्राटी सुरक्षारक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

loading image
go to top