सालीम अली अभयारण्याची अवस्था बिकट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

पुणे - गर्द वृक्षराजी, वाहती मुळा-मुठा अन्‌ नदी परिसरात बारा महिने भरणारे वेगवेगळ्या पक्ष्यांचे अनोखे संमेलन, अशी एकेकाळची ख्याती असणारे येरवड्यातील सालीम अली पक्षी अभयारण्याची आज मात्र दुरवस्था झाली आहे. या परिसरात होणारी बेसुमार वृक्षतोड, कचऱ्याचे साम्राज्य, टाकण्यात आलेला राडारोडा आणि दिवसाढवळ्या सुरू असलेले गैरप्रकार यामुळे हे अभयारण्य दयनीय अवस्थेत आहे. याकडे प्रशासन मात्र काणाडोळा करत आहे. 

पुणे - गर्द वृक्षराजी, वाहती मुळा-मुठा अन्‌ नदी परिसरात बारा महिने भरणारे वेगवेगळ्या पक्ष्यांचे अनोखे संमेलन, अशी एकेकाळची ख्याती असणारे येरवड्यातील सालीम अली पक्षी अभयारण्याची आज मात्र दुरवस्था झाली आहे. या परिसरात होणारी बेसुमार वृक्षतोड, कचऱ्याचे साम्राज्य, टाकण्यात आलेला राडारोडा आणि दिवसाढवळ्या सुरू असलेले गैरप्रकार यामुळे हे अभयारण्य दयनीय अवस्थेत आहे. याकडे प्रशासन मात्र काणाडोळा करत आहे. 

अभयारण्याच्या परिसरात सुरवातीलाच कचऱ्याच्या साम्राज्याचे दर्शन होते. त्यामुळे नाकाला रुमाल लावल्याशिवाय कोणीही आत प्रवेश करू शकत नाही, अशी येथील स्थिती आहे. काही पावले चालल्यावर जागोजागी राडारोडा पडल्याचे निदर्शनास येते. परिसरात प्रवेश केल्यानंतर काही जुने पडके बांधकामही नजरेस पडते. गर्द वृक्षराजी नामशेष होत असल्याचे दिसते, ते येथील बेसुमार वृक्षतोडीमुळे. आजूबाजूचे नागरिक येथे लाकडे गोळा करण्यासाठी येत असल्याचे पाहायला मिळते. तर लाकूड तोडण्याचा आवाजही आपसूक कानाचा वेध घेतो. अनेक झाडांची बेकायदा कत्तल झाल्याचे वास्तव येथे निदर्शनास येते. या वास्तवामुळे अभयारण्याच्या परिसराला बकाल रूप प्राप्त झाले आहे. मात्र याबाबत प्रशासनाकडून वारंवार टोलवाटोलवी होत असल्याचे पाहायला मिळते. 

इकॉलॉजिकल सोसायटीचे संस्थापक डॉ. प्रकाश गोळे यांच्या पुढाकाराने येथे "सालीम अली पक्षी अभयारण्य' विकसित करण्याचा प्रस्ताव तीन दशकांपूर्वी समोर आला. त्याकरिता वाडिया परिवाराने नदीपात्राजवळील जवळपास सात हेक्‍टर जमिनीही देऊ केली. परंतु अभयारण्य विकसित करण्यासाठी वन विभागाकडे पुरेसा निधी उपलब्ध नव्हता, म्हणूनच महापालिकेचे सहकार्य घेण्यात आले. मात्र त्यानंतर या अभयारण्याच्या जबाबदारीवरून वन विभाग आणि महापालिका यांच्यात टोलवा-टोलवी होत असल्याचे पाहायला मिळाले. सध्या ही जागा महसूल विभागाच्या अखत्यारीत आहे. त्याशिवाय या परिसरातील जागेच्या मालकी हक्काबाबत न्यायालयातही खटला सुरू आहे. परंतु महसूल विभागाच्या अखत्यारीत असलेली जागा वन विभागाकडे हस्तांतरित करावी, यासाठी गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र या प्रयत्नांना म्हणावी तशी गती अद्याप मिळालेली नाही. परिणामी, येथील जैववैविध्य धोक्‍यात येत असून, वृक्षराजी दिवसेंदिवस नष्ट होत आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार 
याबाबत उपवनसंरक्षक सत्यजित गुजर म्हणाले, ""जमीन हस्तांतरण प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. याबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात येईल. तसेच जागेची प्रत्यक्ष पाहणी लवकरच करण्यात येईल.'' 

Web Title: salim ali wildlife sanctuaries