esakal | इंदापूरच्या पश्‍चिम भागामध्ये लाळ्या खुरकूत रोगाचे थैमान
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूरच्या पश्‍चिम भागामध्ये लाळ्या खुरकूत रोगाचे थैमान

इंदापूरच्या पश्‍चिम भागामध्ये लाळ्या खुरकूत रोगाचे थैमान

sakal_logo
By
राजकुमार थोरात - सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर: इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये लाळ्या खुरकूत रोगाने थैमान घातले असून २५ पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाला आहे. पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांना शासकीय पुशवैद्यकीय डॉक्टकडून वेळेवरती उपचार मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

हेही वाचा: मनोहर भोसले याची पोलिस कोठडी तीन दिवसांनी वाढली

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील बहुतांश शेतकरी शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय व शेळीपालनाचा व्यवसाय करीत आहेत. पश्‍चिम भागामध्ये जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पश्‍चिम भागातील लासुर्णे, बोरी, आनंदनघन, निंबोडी परिसरातील शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हैसींना लाळ्या खुरकूत रोगाची लागण झाली असल्याने शेतकरी वर्ग अडचणीमध्ये आला आहे. या रोग झालेल्या जनावरांना सुरवातीला ताप येत असून तोंडामध्ये फोड आल्याने खात येत नाही.

तसेच पायाच्या नख्याला जखम होत आहे. जनावरांनी खाण्याचे बंद केल्यास जनावराची रोगप्रतिकार शक्ती कमी होत आहे. यामुळे जनावरे दगविण्याचे प्रमाण वाढू लागली आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये २५ पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांना शासकीय यंत्रणेकडून औषधउपचार मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला असून खासगी डॉक्टरकडे उपचार करण्याची वेळ आहे.

यासंदर्भात आनंदनगर मधील भूमीहीन शेतकरी नानासाहेब गोकुळ साळुंखे यांनी सांगितले की, माझ्याकडे ५० शेळ्या, ५ म्हैसी, १० रेड्या,२ गाई आहेत. सर्व जनावरांना लाळ्या खुरकूत रोगाची लागण झाली होती. लाळ्या रोगामुळे शेळ्यांची पोटात असणारी पिल्ले मेली आहेत. तसेच माझा भाऊ सतिश यांच्याकडे पाच गाई होत्या. यातील दोन गाईंचा लाळ्या खुरकूत रोगाने मृत्यू झाला आहे.

सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये हेलपाटे मारुन डॉक्टर येत नसल्यामुळे खासगी डॉक्टराकडून उपचार करुन घ्यावे लागत आहे. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची वारंवार संपर्क साधल्यानंतर मला तापाची चार इंजेक्शन मिळाली असून माझ्यासारखीच तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था आहे.

यासंदर्भात इंदापूर तालुक्याचे तालुकापशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रामचंद्र शिंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, लाळ्या खुरकूत रोगप्रतिबंधक लस शुक्रवार (ता.१७) रोजी पासून उपलब्ध होणार आहे. १ लाख ५८ हजार लसीचे डोस उपलब्ध होणार असून तालुक्यातील सर्व जनावरांना लसीकरण मोहिम राबविणार असल्याचे सांगितले

loading image
go to top