प्रवीण गायकवाड यांच्या हातावर पुन्हा 'घड्याळ'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

शेतकरी, महिला, कामगार, नोकरदार अशा सर्व वर्गांसाठी पवार यांनी मोठे काम उभे केले आहे. त्यांच्या पुरोगामी धोरणांमुळे महाराष्ट्राची देशात ओळख निर्माण झाली आहे. ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहण्याची इच्छा होती. त्यानुसार हा निर्णय घेतला आहे.

पुणे : संभाजी ब्रिगेडने येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ब्रिगेडच्या राज्य कार्यकारिणीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ताकद बनून येत्या निवडणुकीचे काम करणार असल्याचे गायकवाड यांनी जाहीर केले. ते म्हणाले, ''शेतकरी, महिला, कामगार, नोकरदार अशा सर्व वर्गांसाठी पवार यांनी मोठे काम उभे केले आहे. त्यांच्या पुरोगामी धोरणांमुळे महाराष्ट्राची देशात ओळख निर्माण झाली आहे. ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहण्याची इच्छा होती. त्यानुसार हा निर्णय घेतला आहे.''

गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी शेतकरी कामगार पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक होते. काँग्रेसशी साथ तुम्ही आता सोडली का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की मी काँग्रेसकडून लोकसभेसाठी इच्छुक असल्याने मुंबईत जाऊन पक्षप्रवेश केला होता. मला तिकिट नाकारले तरी मी लोकसभा निवडणुकीत पक्षाचे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे प्रामाणिकपणे काम केले. मात्र काँग्रेसकडून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. पक्षाच्या नेत्यांनी आमच्याबद्दल आपुलकी तर दाखवली नाहीच; पण आमच्या कार्यकर्त्यांची दखलही घेतली गेली नाही. त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याची भूमिका मांडली.'' माझ्या खांद्यावर काॅंग्रेसने फक्त उपरणे टाकले पण स्वीकारले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Brigade leader Pravin Gaikwad support to NCP in assembly election