Farmer Protest: संभाजी ब्रिगेड केंद्र सरकारविरोधात मैदानात; 'शेतकरीविरोधी कृषी विधेयक रद्द करा!'

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 December 2020

शेतीमाल विक्री कायदा लागू करून कृषी उत्पन्न बाजार समितीचे खच्चीकरण करून भांडवलशाही व्यवस्था निर्माण करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे तो थांबविण्यात यावा.

पुणे : शेतकरी विरोधी कृषी विधेयक कायदे रद्द करावेत, तसेच दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरील दडपशाही थांबवावी, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

रशियाच्या लशीची पुण्यात मानवी चाचणी

संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले. शेतीमाल विक्री कायदा लागू करून कृषी उत्पन्न बाजार समितीचे खच्चीकरण करून भांडवलशाही व्यवस्था निर्माण करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे तो थांबविण्यात यावा. शेतकरी विरोधी शेतीमाल विक्री कायदा 2020, कंत्राटी शेती कायदा 2020, अत्यावश्‍यक वस्तु कायदा हे कायदे रद्द करावेत.

रणजितसिंह डिसले यांना 'महाराष्ट्र भूषण' द्या; मुख्यमंत्र्यांकडे मागणी​

शेतमालाला आधारभूत किंमत मिळावी, यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरील दडपशाही तात्काळ थांबवावी. दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा. दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. प्रस्तावित शेतकरी विजबिल विधेयक रद्द करावे यासह विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. 

दहशत माजविणाऱ्या ८ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नागरिकांवर करायचे हल्ले​

या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे मध्य जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, महादेव मातेरे, तेजस्विनी पवार, सागर पोमन, निलेश ढगे, मारुती काळे, जोतिबा नरवडे, महेंद्र जाधव, सुमेध गायकवाड, राजेश गुंड, दिनकर केदारी, बाळू थोपटे, शिवाजी पवार, सोनू शेलार, जयदिप रणदिवे, सुनील वाडेकर, साजिद सय्यद इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Brigade staged a protest against the Central Government