esakal | ‘ब्रेक द चेन’साठी हवी मदतीची ‘चेन’
sakal

बोलून बातमी शोधा

Line for Remdesivir medicine

‘ब्रेक द चेन’साठी हवी मदतीची ‘चेन’

sakal_logo
By
संभाजी पाटील @psambhajisakal

प्रतिबंधक लस उपलब्ध असतानाही कोरोना महामारी एवढा हाहाकार माजवेल याची महिनाभरापूर्वी कोणी कल्पनाही केली नव्हती. ज्या पद्धतीने रुग्णांची संख्या वाढत आहे, ती पाहता परिस्थिती आणखी गंभीर होईल यात आता शंका नाही. अशा परिस्थितीत हार न मानता एकमेकांना शक्यतो सर्व प्रकारची मदत करून प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे यालाच प्राधान्य द्यावे लागेल. ‘कम्युनिटी हेल्प’च्या माध्यमातून मदतीची शृंखला तयार करून उपचार घेणाऱ्या प्रत्येक रुग्णाला वाचवण्यासाठी आणि संसर्गापासून बचावासाठी सर्व प्रयत्न केले तरच ‘ब्रेक द चेन’ शक्य होईल.

आरोग्य यंत्रणेवर ताण आहे. बेड मिळत नाहीत. रेमडेसिव्हिर मिळवण्यासाठी रांगा लागल्या आहेत. दवाखान्यांमध्ये पुरेसे लक्ष दिले जाते की नाही, हे माहिती नाही. डॉक्टर, नर्सेस आणि इतर स्टाफची कमतरता आहे... या आणि अशा असंख्य गोष्टींना सध्या प्रत्येकाला सामोरे जावे लागत आहे. आणखी काही काळ सामोरे जावेच लागेल. कडक निर्बंधानंतरही परिस्थितीत फारशी सुधारणा नाही. अशा वेळी केवळ यंत्रणांना दोष देत किंवा समाज माध्यमांमधून इतरांना ज्ञानाचे डोस पाजण्यापेक्षा प्रत्येकाने कृती करण्याची वेळ आली आहे. कारण, कोरोना आता प्रत्येक घरात घुसला आहे, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. कोणाचे वडील, कोणाची आई, भाऊ, बहीण हॉस्पिटलमध्ये तर हजारो जण घरात उपचार घेत आहेत. अशा वेळी हातावर हात ठेवून बसण्याऐवजी आपल्याला शक्य असेल ती मदत दुसऱ्याला करणे हाच पर्याय असू शकतो.

हेही वाचा: पुणे : बालेवाडीत रेमडेसिव्हीरची बेकायदा विक्री करणाऱ्या सख्ख्या भावांना अटक

एकट्या पुण्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ५५ हजारांच्या वर गेली आहे. जम्बो कोविड हॉस्पिटलसह सर्व शासकीय, खासगी रुग्णालये अक्षरशः भरली आहेत. अत्यवस्थ रुग्णांनी काय करावे, हा प्रश्न आहे. अशा वेळी ज्यांना घरी उपचार घेणे शक्य आहे, त्यांनी रुग्णालयात जाण्याचा हट्ट धरू नये‌. दुसरी गोष्ट अनेक खासगी रुग्णालये, क्लिनिकमध्ये अद्यापही कोविड रुग्ण स्वीकारले जात नाहीत, त्या ठिकाणी स्वतः रुग्णालयांनी पुढाकार घेऊन मदतीसाठी पुढे यायला हवे. वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विविध पॅथीच्या डॉक्टरांनी सरकारी यंत्रणा आपल्याला बोलवेल, मानधन देण्याचा करार करेल याची वाट न पाहता शक्य तेथे स्वतःहून मदतीला धावून जायला हवे. सर्वच डॉक्टर सध्या दिवस-रात्र काम करत आहेत, यात शंका नाही. मात्र, जेव्हा युद्धाची परिस्थिती असते तेव्हा सीमेवरचा जवानही दिवस-रात्र लढत असतो, त्याला जिंकणे एवढेच माहिती असते. आता हीच जिद्द डॉक्टर, नर्सेस आणि सर्व मदतनिसांना ठेवावी लागेल. ही वेळ स्वतः चा विचार करण्याची नाहीच.

मेडिकल दुकानदार, विक्रेते, वितरक यांनाही व्यवसाय सांभाळून सामाजिक भान जपावे लागेल. तुमच्या घरातील सदस्य जेव्हा रुग्णालयात असतो तेव्हा ज्या तडफेने, ज्या किमतीने तुम्ही औषधे पुरवता त्याच तडफेने समाजासाठी ही सेवा देण्याची वेळ आली आहे. ‘आता माझ्या मदतीला जो उभा राहत आहे, त्याच्या मदतीला मी आयुष्यभर उभा राहीन’, ही भावना प्रत्येकाच्या मनात आहे. मदतीच्या या भावनेची शृंखला गुंफली तर व्यवहार आपोआप बाजूला जाईल आणि अडचणीतून बाहेर येण्याचे मार्ग तयार होतील.

हेही वाचा: दुसऱ्यांना हसविणाऱ्या ‘जोकर’च्या डोळ्यात पाणी

प्लाझ्मा थेरपी जास्त परिणामकारक ठरत आहे, अशा वेळी प्लाझ्मा दान, रक्तदानाची चळवळ उभी राहायला हवी. जवळच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान करायला कोणाच्या निमंत्रणाची गरज नको. ज्याला यातील काहीच जमणार नाही, त्याने किमान घराबाहेर न पडून सहकार्य करावे. ही जगण्याची लढाई आहे, ती प्रत्येकाने प्रत्येकासाठी लढली तर विजय आपला आहे. परिस्थिती अजूनही आपल्या हातात आहे, शासकीय यंत्रणा, लसीचे राजकारण, श्रेय यापेक्षा इतरांसाठी ‘मदत’ हा फंडा नक्कीच या संकटातून बाहेर काढेल, याची खात्री आहे.

हे नक्की करा

  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हाॅस्पिटलमध्ये भरतीचा आग्रह धरू नका.

  • घरी उपचार घेण्यासाठी अधिकृत डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार उपलब्ध करून देणे.

  • निर्बंध लादलेत म्हणून नव्हे, तर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी पाळावेत.