esakal | दातृत्वाच्या हातांना हवी साथ!

बोलून बातमी शोधा

Guidance about Coronavirus
दातृत्वाच्या हातांना हवी साथ!
sakal_logo
By
संभाजी पाटील @psambhajisakal

संकटं आली की ती चोहोबाजूंनी येतात. अशा संकटातच प्रत्येकाचा कस लागतो. जवळचा-लांबचा याची ओळख पटते. संकटाशी मुकाबला करण्याचे मार्ग सापडतात. कोरोनाची भयंकर अशी दुसरी लाट सध्या घराघरांत घुसून जीवन उद्ध्वस्त करीत आहे. अशा वेळी ही लाट थोपविण्यासाठी हजारो हातही मदतीसाठी पुढे आले आहेत. प्रशासन, लोकप्रतिनिधींना दोष देण्यापेक्षा हे हात जीव वाचविण्यासाठी, आधार देण्यासाठी, विस्कटलेल्या कुटुंबाला सावरण्यासाठी सुरू असलेले काम लाट परतवून लावण्याची नवी उमेद देत आहेत.

बेड मिळत नाहीत. बेड मिळाल्यानंतर डॉक्टरांनी हातात ठेवलेली रेमडेसिव्हिर इंजेक्शनची चिठ्ठी पाहून धडकी भरते. वणवण करून इंजेक्शन मिळालेच तरी ‘आमच्याकडचा ऑक्सिजन कधीही संपू शकतो’ अशी तंबी दिली जाते. एवढं करूनही रुग्ण वाचेल, याची खात्री नाही. शेवटी स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी रांग लावावी लागते. हे वास्तव सध्या पुणेकर अनुभवत आहेत.

रुग्णांच्या वाढलेल्या आकड्यांनी सर्व यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत. बेडचा तुटवडा आहेच; पण इंजेक्शन, ऑक्सिजनसारख्या गोष्टीही कमी पडत आहेत. उपचार करणारे डॉक्टर, नर्सेस, मदतनीस यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे सर्वत्र भयावह चित्र आहे. मात्र अशा परिस्थितीत एकमेकांना मदत करणारे, धीर देणारे हजारो हात पुण्यात कार्यरत आहेत.

हेही वाचा: रेमडेसिव्हिर, लसीसाठी जागतिक निविदा काढणार : उपमुख्यमंत्री

सरकारी यंत्रणांना दोष देण्यात, त्यांच्या उणिवा शोधण्यात, त्यांना जाब विचारण्यासाठी प्रत्येक जण पुढे असतो, पण आज हीच सरकारी रुग्णालये, जम्बो कोविड हॉस्पिटल, सेंटर्स हजारो रुग्णांचे खरे आधार बनले आहेत. अनेक गंभीर रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. या हॉस्पिटलमधील अनेक डॉक्टर, इतर कर्मचारी महिना-महिना घरी गेलेले नाहीत. त्यांची कामाप्रती असणारी निष्ठा आणि प्रामाणिक प्रयत्न रुग्णांना जीवनदान देत आहे. यंत्रणांवर प्रचंड ताण आहे, खासगी रुग्णालयांमध्ये वेगळे चित्र नाही, अशा वेळी यंत्रणांना पोषक वातावरण निर्माण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पुण्यात हे आता घडताना दिसत आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मराठा चेंबर आणि उद्योग जगत पुढे आले आहेत. सरकारी यंत्रणांना समांतर काम कोविड सेंटरच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात सुरू झाले आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था उपचार कसा मिळेल, यासाठी आता पुढे आले आहेत. त्यातून चाळीस, पन्नास तर कोठे शंभर बेडची सोय असणारे कोविड सेंटर, हॉस्पिटल उभे राहत आहे. ही सकारात्मक बाब आहे. बेड शिल्लक नाही, हे ऐकूनही रुग्ण व नातेवाईक खचत होते. त्यांना दिलासा मिळाला आहे. एका बाजूला उपचारासाठी मदत केली जात आहे, दुसरीकडे घरी उपचार घेणाऱ्या कुटुंबांना मोफत डबा पोहोचवणाऱ्या अनेक संस्था, व्यक्ती बिनबोभाट काम करीत आहेत. अनेक गणेश मंडळे आपापल्या भागातील हातावर पोट असणाऱ्यांना दोन घास मिळतील, यासाठी काम करीत आहेत. शिवाजीनगर भागात राहणारे ७५ वर्षीय कुलकर्णीकाका ‘माझ्या पेन्शनची रक्कम आजच आलीय, मला तृतीयपंथीयांच्या जेवणासाठी मदत करायची आहे, असा फोन ‘सकाळ’मध्ये करतात, तेव्हाच समाजामधील ही एकमेकांना मदत करण्याची भावनाच कोरोनाची लाट सपाट करेल, हा विश्वास देते.

हेही वाचा: पाचवी ते आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आणखी लांबली जाण्याची चिन्हे

संकट नक्कीच मोठे आहे. अशा वेळी केवळ कोणाला तरी दोष देत बसण्यापेक्षा प्रत्येकाची सकारात्मक कृती संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी मदतगार ठरणार आहे. ही वेळ तीच आहे. सरकार, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी काय केले, याचे स्वतंत्र ऑडिट होईल; पण दिवस-रात्र झटणाऱ्या हजारो हातांमधील एक हात माझाही असेल, असे ठरविल्यास या लढाईला सामूहिक शक्तीचे बळ मिळेल, हे नक्की.

हे नक्की करा

  • लक्षणे दिसताच तातडीने उपचार घ्या

  • ‘ब्रेक द चेन’च्या नियमांचे काटेकोर पालन

  • कोरोनाबाधित रुग्ण आणि कुटुंबीयांना सर्व प्रकारची मदत

  • मदतीसाठी झटणाऱ्या संस्था, संघटना, व्यक्तींना प्रोत्साहन