वागूयात! डोकं ठिकाणावर ठेवून

संभाजी पाटील @psambhajisakal
रविवार, 2 ऑगस्ट 2020

आकडेवारीच्या मुद्यावरून एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा पुण्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या कशी आटोक्‍यात आणायची आणि बाधित रुग्णांना विनाअडथळा उपचार कसे द्यायचे यासाठी आता एकत्रित प्रयत्न करायला हवेत. निर्बंध आणखी शिथिल झाल्याने आता घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढेल, अशा वेळी नागरिकांनी स्वतः:ची अधिकाधिक काळजी घेणे आणि प्रशासनाने जनजीवन सुरळीत करण्यासाठी मदत करणे, यालाच सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवे.
 

तब्बल पाच महिन्यानंतर "अनलॉक' च्या माध्यमातून पुणेकरांना अधिकची मोकळीक मिळाली आहे. आणखी दोन दिवसांनी मॉल, व्यापारी संकुले खुली होतील. प्रवास करण्यासाठी रिक्षा, कॅब उपलब्ध होतील. थोडक्‍यात "न्यू-नॉर्मल' कडे आपली वाटचाल वेगाने होईल. पण हे करीत असताना कोरोना आपल्यातून गेलेला नाही, याची जाणीव सतत किंवा आधीपेक्षाही जास्ती ठेवावी लागेल. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या 55 हजारांवर पोहोचली आहे. तेराशेच्यावर मृत्यू झालेत. दररोज हजार दीड हजाराच्या पटीत रुग्णांची भर पडत असताना सर्वांनाच अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एका बाजूला थांबलेली आर्थिक चक्र सुरू करण्यासाठी एकमेकांना हात देत उभे राहावे लागेल. हे करताना निश्‍चितच घराबाहेरही पडावे लागेल. पण अत्याधुनिक साधनांनी अनेक कामे सहजपणे घरातूनच करू शकतो, तीच सवय यापुढेही अंगी बाणावी लागेल. बॅंकेचे व्यवहार करण्यासाठी किंवा विम्याचा हप्ता भरण्यासाठी रांगा लावण्याची पद्धत मोडूनच काढावी लागेल. कारण व्यवहार सुरळीत करतानाही आरोग्यालाच पहिले प्राधान्य द्यावे लागेल. त्यातही ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, उच्च रक्तदाबापासून इतर व्याधी झालेल्यांची त्यांच्या कुटुंबाला, मित्रांना, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांना अधिक काळजी घ्यावी लागेल. कोरोना संपलेला नाही, त्याला मास्क, सॅनिटायझेशन, अनावश्‍यक गर्दी न करणे अशा प्रतिबंधात्मक उपायांनी दूर ठेवायचे आहे, हे समाजभान सातत्याने वाढवावे लागेल. हे पुन्हा पुन्हा सांगण्याचे कारण हेच की, गेल्या दोन महिन्यातील पुण्यातील अनुभव चांगला नाही. काही क्षणांमध्ये आपण सर्वकाही विसरून पुन्हा बेधुंद, बेजबाबदार वागायला लागतो. त्यामुळे मास्क घातला नाही, म्हणून पोलिसांनी दंड करण्यापेक्षा घरातून बाहेर पाऊल टाकतानाच कुटुंबातील इतर व्यक्तींनी अशांना अडवायला हवे.

-पुणे विद्यापीठाचा आणखी एक करार; विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी!

रुग्ण वाढत असल्याने जम्बो रुग्णालय उभारण्याची तयारी सध्या सुरू आहे. पण सध्या अस्तित्वात असणाऱ्या बेडला ऑक्‍सिजनसह इतर सुविधा देण्यास प्राधान्य दिल्यास वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींच्या सूचना यांचा एकत्रित समन्वय साधल्यास मुंबई, मालेगाव प्रमाणे पुण्यातील संख्याही नक्कीच आटोक्‍यात आणता येईल. त्यासाठी लोकमान्य टिळकांच्याच भाषेत गरज आहे ती प्रत्येकाने डोकं ठिकाणावर ठेवून वागण्याची.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sambhaji Patil Writes about in New Normal at Pune After Corona Pandemic