पुढील हंगामात उसाच्या क्षेत्रात २८ टक्क्‍यांनी होणार घट ; साखर उत्पादन राहणार तेवढेच

अनिल सावळे
सोमवार, 10 जून 2019

पुणे : यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पुढील हंगामात उसाच्या क्षेत्रात २८ टक्क्‍यांनी घट होणार असून, तेवढीच साखर उत्पादनात होईल अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. 
 

पुणे : यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पुढील हंगामात उसाच्या क्षेत्रात २८ टक्क्‍यांनी घट होणार असून, तेवढीच साखर उत्पादनात होईल अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. 

गतवर्षी उसाचे क्षेत्र 11 लाख 62 हजार हेक्‍टर होते. पुढील हंगामात ते घटून आठ लाख 62 हजार होईल. यात पावसाच्या परिषदेमुळे थोडाफार बदल होईल. गायकवाड म्हणाले, ''गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यंदा साखरेचे सर्वाधिक उत्पादन 107.21 लाख टन झाले आहे. नुकत्याच संपलेल्या हंगामात शेतकऱ्यांना एफआरपीपोटी (रास्त व किफायतशीर दर) 23 हजार 300 कोटी रुपये देण्यात आले आहेत. सुमारे 94 टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. ज्या कारखान्यांनी एफआरपी दिली नाही, अशा कारखान्यावर महसुली जप्तीची (आरआरसी) कारवाई करण्यात आली आहे.

एफआरपीऐवजी काही कारखान्यांनी शेतकऱ्यांसोबत तीन टप्प्यात पैसे देण्याचा करार केला आहे. परंतु कारखान्यांनी ही रक्कम त्यानुसार दिली पाहिजे. तसेच, ही रक्कम 14 दिवसात देणे बंधनकारक आहे. ही रक्कम न दिल्यास शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम 15 टक्के व्याजासहित द्यावी लागणार आहे. गेल्या हंगामात 320 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ही साखर दोन वर्षे पुरेल इतकी आहे. साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे  इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात येत असून, या संदर्भात साखर आयुक्तालयाकडून मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव देण्यात आला आहे. इथेनॉल उत्पादन सरकारने किमान दहा वर्षांची दराची हमी द्यावी आणि किमान दर ठरवून घ्यावेत अशी इथेनॉल उत्पादकांची मागणी आहे.

राज्यात 2009 मध्ये खासगी साखर कारखान्यांची संख्या 28 होती. ती आता 93 वर पोहोचली आहे. राज्यात एकूण 195 साखर कारखान्यांपैकी 93 कारखाने खासगी आहेत. तसेच यापुढील काळात खासगी कारखान्यांची संख्या निम्म्यावर जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The is same in sugar production but the area of sugarcane will fall by 28% in next season