समृद्धी महामार्गावर सिनेस्टाईल अपघात

समृद्धी महामार्गावर सिनेस्टाईल अपघात
Published on: 

मुख्य अंक पान-१ साठी

‘समृद्धी’वर कंटेनरची
१८ वाहनांना धडक

२० प्रवासी गंभीर जखमी : अतिवेगाने अनेक वाहनांचा चक्काचूर


सकाळ वृत्तसेवा
सिंदखेड राजा, ता. १३ : दिवाळी सण आटोपून परतणाऱ्या प्रवाशांसाठी समृद्धी महामार्गावरील प्रवास कमालीचा त्रासदायक ठरला. सिंदखेड राजा तालुक्यातील तढेगावजवळ खडकपूर्णा नदीच्या पुलावर ‘मुंबई कॉरिडॉर चॅनेल क्रमांक ३२०’ वर भरधाव कंटेनरने तब्बल १७ प्रवासी वाहनांसह पोलिसांच्या एका वाहनाला फरपटत नेल्याची भीषण घटना शुक्रवारी (ता.१३) सकाळी साडे अकराच्या समारास घडली.

या अपघातात सुमारे २० प्रवासी गंभीर, तर २५ ते ३० प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींमध्ये लहान बालकांचा समावेश आहे. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या प्रवाशांचा यात समावेश होता. या अपघातात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, खडकपूर्णा नदीवरील पुलाजवळ सिमेंट घेऊन जाणारा मिक्सर कंटेनर उलटला होता. हा कंटेनर बाजूला करण्यासाठी पोलिसांकडून वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, मुंबई कॉरिडॉरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरची (एमएच ४० बीएल ४९११) सुरुवातीला पोलिसांच्या स्कॉर्पिओला (एमएच २८ सीसी ६८३०) मागून जोरदार धडक बसली. यानंतर कंटेनरने समोर थांबलेल्या वाहनांना एकापाठोपाठ धडक देत एकूण १८ वाहनांना फरपटत नेले. ही धडक इतकी भीषण होती की अनेक वाहने एकमेकांवर आदळली. काही वाहनांमध्ये प्रवासी अडकून पडल्याने घटनास्थळी एकच आक्रोश सुरू झाला. अपघातानंतर इतर वाहनांतील प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेत अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तत्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना सिंदखेड राजा व जालना येथील रुग्णालयांत उपचारासाठी हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथक, स्थानिक रहिवासी, समृद्धी महामार्ग कर्मचारी, रुग्णवाहिका डॉक्टरांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत करून वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.