सणसवाडी ग्रामस्थांचा सामाजिक सलोख्याचा निर्धार

भरत पचंगे
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

शिक्रापूर (शिरूर, पुणे): सणसवाडी गावातील भैरवनाथ मंदिर येथे समस्त ग्रामस्थ व सुरेश सकट यांचे कुटुंबीय यांनी आज (शुक्रवार) एकत्र येऊन सामाजिक एकोप्याचे आदर्श निर्माण करण्याचा संकल्प केला.

शिक्रापूर (शिरूर, पुणे): सणसवाडी गावातील भैरवनाथ मंदिर येथे समस्त ग्रामस्थ व सुरेश सकट यांचे कुटुंबीय यांनी आज (शुक्रवार) एकत्र येऊन सामाजिक एकोप्याचे आदर्श निर्माण करण्याचा संकल्प केला.

1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या कोरेगाव भीमा घटनेमुळे परिसरातील गावांमधील वातावरण कलुषित झाले होते. परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्याने दलित व सवर्ण संबंधांमध्ये अंतर पडले होते. परंतू आज सर्व ग्रामस्थ व सुरेश सकट यांच्या परिवाराने एकत्र येऊन विस्कटलेली सामाजिक वीण पुन्हा साधण्याचा कौतुकास्पद पुढाकार घेतला. परस्परांकडून झालेल्या चुकांबाबत एकमेकांना माफ करून परिसरामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याचे निश्चय सर्वांनी केला आहे.

29 डिसेंबर रोजी वढू बुद्रुक गावामध्ये घडलेल्या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण होऊन परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. परंतु, त्यानंतर वढू बुद्रुक ग्रामस्थांनी संवादाचा मार्ग वापरून गावातील सामाजिक सलोखा टिकवून ठेवला होता. अशाच पद्धतीने सणसवाडी ग्रामस्थांनी एकत्र येऊन सामाजिक सलोखा जपला. सणसवाडी येथील भैरवनाथ मंदिर येथे झालेल्या बैठकीमध्ये गावातील सरपंच रमेश सातपुते, दत्तात्रय हरगुडे, पंडित दरेकर, वैभव तात्या यादव, शिवाजी दरेकर, सुरेश सकट, दिलीप सकट, आशाताई दरेकर, पोलिस पाटील सणसवाडी व ग्रामस्थ होते.

सणसवाडी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन केलेल्या कौतुकास्पद कामाचे बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी अभिनंदन केले. विस्कटलेली सामाजिक वीण पुन्हा जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे. सणसवाडी परिसर हा औद्योगिकदृष्ट्या प्रगत भागातून अनुचित घटना घडल्याने गावाची प्रतिमा खराब होत आहे. ती प्रतिमा खराब होऊ नये यासाठी यापुढे ग्रामस्थांनी सामाजिक सलोखा जपावा, असे आवाहन त्यांनी केले. सणसवाडी ग्रामस्थांनी आज दाखवलेल्या या सामंजस्याच्या भूमिकेचे परिसरातून कौतुक होत आहे.

Web Title: sanaswadi people together after koregaon bhima incident