भांडगावच्या गायरानात चोरीचा मामला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

यवत - भांडगाव (ता. दौंड) येथील गायरानात छोटे तलाव करून तेथे वाळू धुण्याचा धंदा मागील अनेक वर्षांपासून जोमात सुरू आहे. सरकारी जमीन, चोरीची वीज, सरकारी पाणी, अवैध वाळू उत्खनन असा उच्छाद येथे वाळूचोरांनी मांडला आहे. त्याकडे महसूल विभाग मात्र अर्थपूर्ण डोळेझाक करीत आहे. त्यास राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा परिसरात आहे. 

भांडगावच्या दक्षिणेकडील शिवारात सुमारे शंभर एकरांचे गायरान आहे. या जमिनीलगत खोरच्या खिंडीतून येणारा ओढा वाहतो. या ओढ्याच्या पात्रात अनेक स्थानिकांच्या विहिरी आहेत. या विहिरींचे पाणी उपसून गायरानात केलेले तलाव भरले जातात. हे पाणी डिझेल इंजिन किंवा चोरीची वीज वापरून बसविलेल्या वीजपंपांच्या साहाय्याने उपसून वाळू धुतली जात आहे. मुळात जमीन सरकारी, पाणी सरकारी, वीजही सरकारी आणि वाळूही अवैध उत्खनन केलेली, असा सर्व चोरीचा मामला येथे अनेक वर्षांपासून सुरू आहे. या गायरानात आठ ते दहा तलाव तयार करण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासन, महसूल विभाग, स्थानिक पुढारी हे काणाडोळा करत असल्याने हा धंदा मागील काही वर्षांपासून जोमात सुरू आहे. येथील वाळूचोरांकडून सर्व संबंधितांचे हात ओले केले जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.  

मातीलाही मागणी 
मातीमिश्रित वाळू येथे ट्रकमध्ये भरून आणली जाते. त्यात जादा दाबाने पाण्याचे फवारे सोडण्यात येतात, त्यामुळे पाण्यासोबत माती वाहून तलावातील पाण्यात साठत राहते. या साठलेल्या मातीलाही अनेक व्यावसायिक व शेतकऱ्यांकडून मागणी आहे. ही माती भरून नेली जाते. यावरून वाळू धुण्याच्या व्यवसायाच्या व्याप्तीचा अंदाज येतो.

Web Title: sand theft in bhandgaon taluka Daund