जिल्ह्यात 4 लाख मद्यपींना परवाने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

सांगली - "थर्टी फर्स्ट' च्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू पिण्याचे एक दिवसाचे तब्बल 4 लाख परवाने वाटप केले आहे. अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी पथकामार्फत छापासत्र सुरू केले आहे. तसेच जिल्ह्यात जत, मिरज आणि राष्ट्रीय महामार्गावर "चेकपोस्ट' उभारले जाणार आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी देखील जय्यत तयारी केली आहे. "ड्रंक अँड ड्राईव्ह' विरोधी मोहीम राबवली जाणार आहे.

सांगली - "थर्टी फर्स्ट' च्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू पिण्याचे एक दिवसाचे तब्बल 4 लाख परवाने वाटप केले आहे. अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी पथकामार्फत छापासत्र सुरू केले आहे. तसेच जिल्ह्यात जत, मिरज आणि राष्ट्रीय महामार्गावर "चेकपोस्ट' उभारले जाणार आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी देखील जय्यत तयारी केली आहे. "ड्रंक अँड ड्राईव्ह' विरोधी मोहीम राबवली जाणार आहे.

मावळत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी तरुणाई प्रत्येक वर्षी उत्सुक असते. यंदाही हॉटेल, ढाबे, खानावळी अगोदरच बुक करून ठेवले आहेत. दारू पिण्याचे एक दिवसाचे परवाने मिळवण्यापासून ते थर्टी फर्स्टचा जल्लोष कसा करायचा याचे बेत ठरवले गेले आहेत. तर दुसरीकडे जल्लोषाला गालबोट लागू नये म्हणून उत्पादन शुल्क व पोलिस प्रशासनामार्फत प्रयत्न सुरू आहेत.

उत्पादन शुल्कने ढाबे, हॉटेल, बार, परमिट रूम यांची तपासणी सुरू केली आहे. त्यासाठी चार पथके तैनात केली आहेत. पथकामार्फत छापे मारून तपासणी केली जात आहे. तसेच रात्रीची गस्तही घातली जात आहे. अन्य राज्यातून किंवा जिल्ह्यातून अवैध मद्य वाहतूक जिल्ह्यात होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर 500 मीटर परिसरात दारूची विक्री होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.

जिल्ह्यातील जत, मिरज ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत कर्नाटकातून अवैध दारूची वाहतूक होणार नाही यासाठी तात्पुरते चेकपोस्ट उभारले आहेत. कर्नाटकातून येणाऱ्या गाड्यांची तपासणी केली जात आहे. तसेच बसस्थानक व रेल्वेस्थानकावर देखील तपासणी सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गावर देखील चेकपोस्ट उभारून तपासणी सुरू आहे.

थर्टी फर्स्टला दारू पिण्याचा परवाना असल्याशिवाय दारूची विक्री होणार नाही याची दक्षता घेतली आहे. एक दिवसाचे दारू पिण्याचे तब्बल 4 लाख परवाने जिल्ह्यात वाटप केले आहेत. विदेशी दारू पिण्यासाठी 5 रुपये, तर देशी दारूसाठी 2 रुपयाचा परवाना आवश्‍यक असणार आहे. परवाना नसेल तर कारवाई केली जाईल. या दिवशी रिटेल मद्यविक्री मध्यरात्रीनंतर 1 वाजेपर्यंत राहील. तर बार सकाळी 5 पर्यंत खुले राहणार आहेत.

अवैध मद्यापासून सावध-
अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने पुरेसी खबरदारी घेतली आहे. ग्राहकांनी देखील अधिकृत ठिकाणीच मद्य खरेदी करावी. तसेच अधिकृत परवाना असलेल्या ठिकाणीच मद्यपान करावे. अवैध मद्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी संबंधितांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.
-प्रकाश गोसावी (अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क)

पोलिसांची नाकाबंदी-
थर्टी फर्स्टच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी आजपासूनच सुरू केली आहे. थर्टी फर्स्टला पोलिसांची कडक नाकाबंदी राहणार आहे. "ड्रंक अँड ड्राईव्ह' विरोधात कारवाई केली जाईल. डॉल्बीचा दणदणाट केल्यास गुन्हे दाखल केले जाणार आहेत. पोलिसांची गस्त सर्वत्र राहणार आहे. हुल्लडबाजी करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवले जाणार आहेत.

Web Title: Sangli district 4 million licenses alcoholic