'सांगली-कोल्हापूर जिल्हयातील पूरपरिस्थीती संशोधनासाठी निधी कमी पडू देणार नाही'

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील माहिती घेऊन, तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा करुन पुढील दिशा ठरवावी असे निर्देश दिले.

पुणे - सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत तज्ज्ञांनी केलेले संशोधन, सूचवलेल्या उपाययोजनांबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. तसेच दोन्ही जिल्ह्यांतील पुरस्थितीबाबत पुढील संशोधनासाठी शासन निधी उपलब्ध करुन देईल, असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिले . 

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीबाबत पुण्यातील "अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च' आणि "शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया'चे तज्ज्ञ संशोधन करत आहेत. या तज्ज्ञांची निरीक्षणे, संशोधन, उपाययोजनांचा आढावा पवार यांनी आज घेतला. त्यावेळी त्यांनी हे आश्‍वासन दिले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, धरण पुनर्स्थापना समितीचे जागतिक बॅंकेचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपक मोडक, तज्ज्ञ डॉ. पद्माकर केळकर, प्रा. सुधीर आगाशे, प्रा. भालचंद्र बिराजदार, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ प्राध्यापक उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

"कृष्णा खोरे, पूर आणि उपाययोजनां'संदर्भात तज्ज्ञांनी सादर केलेल्या अहवालाचे सादरीकरण धरण पुनर्स्थापना समितीचे दीपक मोडक व डॉ. पद्माकर केळकर यांनी केले. कृष्णा नदीला येणाऱ्या पुरामध्ये कोयना, राधानगरी आदी धरणांच्या सांडव्याच्या विसर्गाचा भाग 30 ते 40 टक्के असतो. धरणामध्ये पावसाळ्यात तारखेनुसार किती पाणीपातळी राखावी, याबाबत नव्याने नियोजन करणे आवश्‍यक आहे, असे त्यांनी सांगितले. कोयना धरणाच्या पाणीपातळीबाबत तयार केलेले वेळापत्रकही मोडक यांनी यावेळी सादर केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यावर पवार यांनी यासंदर्भातील माहिती घेऊन, तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा करुन पुढील दिशा ठरवावी असे निर्देश दिले. या दोन्ही जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवर आधारित पुढील संशोधनासाठी राज्य शासन अर्थसहाय्य उपलब्ध करून देईल, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli, Kolhapur district will not be less funds for flood research says ajit pawar