esakal | काय सांगता? सांगवी वर्षभरात तब्बल ४०५ वेळा अंधारात

बोलून बातमी शोधा

Electricity Shortage
काय सांगता? सांगवी वर्षभरात तब्बल ४०५ वेळा अंधारात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सांगवी परिसरात जेसीबी व इतर यंत्राद्वारे सुरू असलेल्या विविध ठिकाणच्या खोदकामात भूमिगत उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या गेल्या वर्षभरात तब्बल ४०५ ठिकाणी तुटण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे वीजग्राहकांना वर्षभर नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मार्च महिन्यात महावितरणची उच्चदाबाची भूमिगत वीजवाहिनी खोदकामात तोडल्यामुळे महापारेषणच्या रहाटणी १३२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र नादुरुस्त झाले होते. त्यामुळे सांगवी उपविभागातील १ लाख ९० हजार वीजग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या सर्वच सातही वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला होता. हे रोहित्र बदलण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागला. या कालावधीत पर्यायी व्यवस्था म्हणून भागात चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागले होते.

हेही वाचा: पुणेकरांना दिलासा; ‘घरबंदी’मुळे रुग्णसंख्या आटोक्यात

सध्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सांगवीमधील पीडब्लूडी ग्राऊंडवर कोविड रुग्णालय लवकरच उभारले जाणार आहे. मात्र, खोदकामात वीजवाहिन्या तोडण्याचे प्रकार सुरू राहिल्यास या रुग्णालयासह सांगवीमधील इतर रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. पिंपरी विभाग अंतर्गत सांगवी उपविभागात वाकड, ताथवडे, जुनी व नवी सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, विशालनगर, थेरगावचा काही परिसराला वीजपुरवठा केला जातो. मागीलवर्षी १ एप्रिलपासून आतापर्यंत या परिसरात महावितरणच्या उच्चदाबाच्या ७४ आणि लघुदाबाच्या ३३१ भूमिगत वीजवाहिन्या खोदकामामध्ये तोडण्यात आल्या आहेत. या भागात रस्त्याचे रुंदीकरण, पाण्याचे व ड्रेनेजचे पाईपलाइन्स, खासगी कंपन्यांचे केबल्स टाकण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे.

दरम्यान, आतापर्यंत एकूण सात प्रकरणांमध्ये महावितरणकडून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा: मासिक पाळी, गर्भवती, स्तनपान आणि लसीकरण; दूर करा गैरसमज

वीजविक्रीमध्ये नुकसान

महावितरणला कोणतीही पूर्वसूचना न देता खोदकाम सुरू आहे. त्यामुळे वीजवाहिन्या तोडण्याचे प्रकार वाढले आहे. पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ न शकल्यास दोन ते तीन तास वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे महावितरणला वीजविक्रीमध्ये नुकसान तसेच वाहिनी दुरुस्तीचा खर्च सहन करावा लागत आहे. सोबतच ग्राहकांनाही खंडित वीजपुरवठ्याचा नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. एकाच ठिकाणी दोन ते तीन वेळा भूमिगत वाहिनी तोडली जात असल्याचेही प्रकार दिसून आले आहेत.

हेही वाचा: पुण्यासाठी ३५ हजार लस उपलब्ध; सोमवारी लसीकरण सुरळीत होण्याची शक्यता