बारा हजार स्वच्छतागृहे उभारण्याचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 सप्टेंबर 2016

पिंपरी - केंद्र सरकारच्या "स्वच्छ भारत अभियाना‘अंतर्गत महापालिका क्षेत्रात 2 हजार 608 वैयक्तिक स्वच्छतागृहांची उभारणी केली आहे. मार्च-2017 अखेर 11 हजार 684 कुटुंबांना या अभियानात जोडण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे.
 

पिंपरी - केंद्र सरकारच्या "स्वच्छ भारत अभियाना‘अंतर्गत महापालिका क्षेत्रात 2 हजार 608 वैयक्तिक स्वच्छतागृहांची उभारणी केली आहे. मार्च-2017 अखेर 11 हजार 684 कुटुंबांना या अभियानात जोडण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे.
 

केंद्र सरकारने देशभरात दोन ऑक्‍टोबर 2014 ला स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली. केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारनेही स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राबविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ज्या कुटुंबाकडे स्वत:चे स्वतंत्र स्वच्छतागृह नाही त्यांना त्यासाठी निधी दिला जात आहे. शहर हागणदरीमुक्त करणे, हा अभियानाचा उद्देश आहे. राष्ट्रीय जनगणना-2011 नुसार महापालिका क्षेत्रातील एकूण 11 हजार 684 कुटुंबांसाठी वैयक्तिक स्वच्छतागृह उभारण्याचे नियोजन आहे.

महापालिकेकडे वैयक्तिक स्वच्छतागृह बांधकामासाठी 5 हजार 835 कुटुंबांनी अर्ज केले. स्वच्छ भारत अभियानाच्या संकेतस्थळावर 5 हजार 489 अर्ज अपलोड झाले. मंजूर 3 हजार 999 अर्जांपैकी आतापर्यंत 2 हजार 608 वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधून पूर्ण झाली आहेत. 623 वैयक्तिक स्वच्छतागृहे उभारण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती सह-आयुक्त दिलीप गावडे यांनी "सकाळ‘ला दिली.

लाभार्थ्याला केंद्र सरकारकडून चार हजार, राज्य सरकारकडून आठ हजार आणि महापालिका हिस्सा चार हजार रुपये याप्रमाणे वैयक्तिक घरगुती स्वच्छतागृह उभारण्यासाठी अनुदानाची रक्कम देण्यात येते. अर्ज पात्र ठरल्यानंतर आठ हजार व बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आठ हजार रुपये लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर थेट जमा केले जातात. त्यानुसार 3 हजार 944 लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता; तर 1 हजार 841 लाभार्थ्यांना अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम दिली आहे. महापालिकेला वैयक्तिक घरगुती स्वच्छतागृह उभारणीसाठी केंद्राकडून एक कोटी 24 लाख 96 हजार; तर राज्य सरकारकडून दोन कोटी 49 लाख 92 हजार इतके अनुदान मिळाले आहे. 

Web Title: Sanitary set to challenge twelve thousand