आळंदीत २५ नोव्हेंबरला संजीवन समाधी सोहळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या ७२४ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या कार्तिकी वारीची सुरवात देऊळवाड्याच्या महाद्वारातील गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने २० नोव्हेंबरला होणार आहे. कार्तिकी एकादशी २३ नोव्हेंबरला आहे.

आळंदी - संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या ७२४ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या कार्तिकी वारीची सुरवात देऊळवाड्याच्या महाद्वारातील गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने २० नोव्हेंबरला होणार आहे. कार्तिकी एकादशी २३ नोव्हेंबरला आहे. एकादशीनंतर येणाऱ्या द्वादशी या तिथीचा क्षय झाल्याने समाधी दिन सोहळा २४ ऐवजी कार्तिक वद्य त्रयोदशी म्हणजे २५ नोव्हेंबरला होणार आहे, अशी माहिती आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त ॲड. विकास ढगे यांनी दिली.

ॲड. ढगे यांनी सांगितले, की कार्तिकी वारीची सुरवात यंदा कार्तिक वद्य अष्टमीला म्हणजे बुधवारी (ता. २०) गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सकाळी सात ते नऊ या वेळेत होईल. दरम्यान, राज्यातील सर्वच दिनदर्शिकांमध्ये लागोपाठ दोन एकादशी दाखविल्या आहेत. संप्रदाय भागवत एकादशी साजरी करत असल्याने शनिवारी (ता. २३) एकादशीनिमित्त मध्यरात्री बारा ते पहाटे दोनच्या दरम्यान माउलींच्या समाधीस ११ ब्रह्मवृंदांच्या वेदघोषात पवमान अभिषेक आणि दुधारती होईल. या कालावधीत भाविकांना समाधी दर्शन बंद असेल. पवमान अभिषेकानंतर समाधी दर्शन पुन्हा सुरू केले जाईल. या दिवशी भाविकांच्या महापूजा बंद असतील. दुपारी एक वाजता माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी देऊळवाड्यातून बाहेर पडेल. नगरप्रदक्षिणेनंतर पालखी रात्री साडेआठला देऊळवाड्यात परतणार असून रात्री बारा ते दोन जागर होईल. एकादशीच्या पहाटपूजेनंतर रविवारी (ता. २४) द्वादशी साजरी केली जाणार असून मध्यरात्री दोनला माउलींच्या समाधीवर पवमान अभिषेक होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjivan Samadhi sohala in alandi