‘इंडिया विरुद्ध भारत’ची दरी शिक्षणाद्वारे कमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

देशात इंडिया विरुद्ध भारत, यामधील दरी वाढत आहे आणि हे आपल्यासमोरचे सर्वांत मोठे आव्हान आहे. शिक्षणातून ही दरी कमी करता येणे शक्‍य आहे. मात्र, त्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांनी येथे केले.

पुणे - देशात इंडिया विरुद्ध भारत, यामधील दरी वाढत आहे आणि हे आपल्यासमोरचे सर्वांत मोठे आव्हान आहे. शिक्षणातून ही दरी कमी करता येणे शक्‍य आहे. मात्र, त्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांनी येथे केले.

डीपर, सर फाउंडेशन व साद माणुसकीची या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांतर्फे प्राचार्य जाधव यांना ‘संस्थापालक’ सन्मानाने गौरविण्यात आले. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. ५१ हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या प्रसंगी रंजना जाधव, ग्राहक पेठचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, कार्यक्रमाचे आयोजक हरीश बुटले आदी उपस्थित होते. प्राचार्य जाधव यांनी एक लाख रुपये सामाजिक कार्यासाठी डीपर, सर फाउंडेशन व साद माणुसकीची या संस्थांना देण्याची घोषणा केली. 
जाधव म्हणाले, ‘‘परिस्थिती नेहमीच सकारात्मक असत नाही. कुठल्याही परिस्थितीत संस्थेचे अहित होणार नाही याची काळजी संस्थेच्या पालकांनी घेतली पाहिजे.’’ 

पवार म्हणाले, ‘‘कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे यांच्यासारख्या संस्थांमुळे राज्यातील कित्येक पिढ्या घडल्या व घडताहेत. पुणे हे संस्थांचे शहर आहे. एकेका विषयावर अनेक संस्था येथे काम करतात. भाऊसाहेब जाधव यांनी मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे बीज उत्तमरीतीने जोपासले व वाढवले. हरीश बुटले यांनी योग्य व्यक्तीची निवड संस्थापालक सन्मानासाठी केली.’’विद्येचे दान केले जाते. मात्र, अलीकडच्या काळात विद्येचा व्यवसाय काही मंडळींनी केला. अशा परिस्थितीत प्राचार्य जाधव यांना संस्थापालक सन्मान देऊन बुटले यांनी विद्येचे महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न केला, असे पाठक यांनी सांगितले. 

ग्रामसुधार व ग्रामविकास या विषयावर सुरू असलेले उपक्रम आणि बारावीनंतरच्या इंजिनिअरिंग व मेडिकल प्रवेशासाठीच्या परीक्षेसाठी घेण्यात येत असलेल्या सराव परीक्षेबद्दल संस्थेतर्फे बुटले यांनी माहिती दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sansthapalak Award India Bharat Education