Pune News : संत ज्ञानेश्‍वरांनी मराठी साहित्यातील भेद मिटविले- डॉ.सदानंद मोरे

मोरे यांच्या हस्ते शिवाजीराव सावंत स्मृतिप्रीत्यर्थ साहित्य पुरस्कार प्रदान
Sant dnyaneshwar erased differences in Marathi literature dr sadanand More
Sant dnyaneshwar erased differences in Marathi literature dr sadanand MoreSakal

पुणे : ""मराठी भाषेत वैचारीक साहित्य व रमणीय ललित साहित्य असे दोन प्रकारचे भेद आपण करतो. मात्र संत ज्ञानेश्‍वर यांनी गीतेवर केलेल्या भाष्यात साहित्यातील या दोन प्रकारांमधील भेद मिटविले आहेत. म्हणूनच भारतीय साहित्यात मराठी साहित्य वेगळ्या प्रकारचे ठरते. इतकेच नव्हे, तर ज्ञानेश्‍वर महाराजांनी भगवद्‌गीतेच्या चौकटीत विचार करण्याची आपल्याला सवय लावली'' असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे यांनी सोमवारी व्यक्त केले.

मृत्युंजय प्रतिष्ठान आणि "मृत्युंजय'कार शिवाजीराव सावंत स्मृती समितीच्यावतीने साहित्य व समाजकार्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ संपादक अरविंद व्यं. गोखले यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते "शिवाजीराव सावंत स्मृती साहित्य पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

तर समाजकार्य पुरस्कार मुंबईच्या चतुरंग प्रतिष्ठानला देण्यात आला. यावेळी मृत्युंजय प्रतिष्ठानच्या मृणालिनी शिवाजीराव सावंत, अमिताभ सावंत, डॉ. सागर देशपांडे, इंद्रायणी दीक्षित आदी उपस्थित होते.

मोरे म्हणाले, ""भाषा ही साहित्याचे मूलद्रव्य आहे. साहित्य हे समाजासाठी आवश्‍यक असून भाषेत समाजाचा इतिहास समाविष्ट असतो. मात्र मराठी भाषेमध्ये वैचारीक साहित्य व रमणीय ललित साहित्य असा भेद केला जातो. हा भेद संत ज्ञानेश्‍वर यांनी मिटविण्याचे काम केले.''

पाटील म्हणाले, ""शिवाजीराव सावंत यांचे साहित्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मराठी साहित्यातील त्यांच्या योगदानामुळेच मला त्यांच्या नावाने "फिरते पुस्तकालय' व त्यांच्या जन्मगावी स्मृती दालन सुरू करायचे आहे. हे पुस्तकालय सर्वांसाठी मोफत असेल, त्याचबरोबर ते प्रत्येक गावापर्यंत पोचेल आणि ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांना पुस्तके वाचायला मिळतील.''

सावंत यांच्यासमवेतच्या आठवणींना गोखले यांनी उजाळा दिला. गोखले म्हणाले, ""शिवाजीराव सावंत यांच्याशी माझी कोल्हापूरपासून ओळख होती. त्यांच्यासोबत कायम जिव्हाळ्याचे नाते राहिले. सावंत एकदा गोव्याला जाताना मला भेटायला आले,

पण त्या भेटीनंतर आम्ही पुन्हा कधीच भेटणार नाही, याची मला कल्पना नव्हती. त्यांच्या नावाने मिळणारा पुरस्कार माझ्यासाठी खुप मोलाचा व महत्वाचा आहे.'' कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सागर देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन अनिरुद्ध वडके यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com