आळंदीत माउलींचा अंखड जयघोष

आळंदीत माउलींचा अंखड जयघोष

आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरासमोरील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने शुक्रवारी (ता. ३०) कार्तिकी वारी सोहळ्यास प्रारंभ झाला. दूध, दही, मध, साखर, तूप, अत्तराच्या शिंपणाबरोबर ब्रह्मवृंदांचा मंत्रोच्चार आणि साथीला टाळ-मृदंगाच्या निनादात माउली नामाचा अखंड जयघोषात सुरू होता. 

गेल्या चार दिवसांपासून राज्यभरातून भाविक माउलींच्या संजीवन समाधिदिन सोहळ्यास  हजेरी लावण्यासाठी दाखल होत आहे. ठिकठिकाणी राहुट्या आणि तंबूतून मुक्कामी राहिलेले वारकरी सकाळी इंद्रायणी स्नानानंतर माउलींच्या समाधी दर्शनासाठी गर्दी करत होते. सकाळी नऊच्या दरम्यान माउलींच्या समाधी मंदिरापुढील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाच्या कार्यक्रमास  हजेरी लावण्यासाठी महाद्वारात भाविकांची गर्दी होऊ लागली. महाद्वारातून प्रवेश बंद ठेवण्यात आला. गुरू हैबतबाबांची पायरी मंदिराच्या सेवकांनी स्वच्छ  धुऊन घेतली. त्यानंतर पायरीपूजनाच्या मुख्य कार्यक्रम सुरू झाला. या वेळी श्रीकृष्ण तुर्की, श्रीनिवास कुलकर्णी यांनी पूजेसाठी पौराहित्य केले.

गुरू हैबतबाबांच्या पायरीचे विधिवत पूजन झाल्यानंतर  माउलींची आरती म्हणण्यात आली. त्यानंतर देऊळवाड्यातील गुरू हैबतबाबांच्या ओवरीत आरती करण्यात आली. या वेळी पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ आरफळकर, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे, बाबूराव चोपदार, डॉ. अभय टिळक, अजित कुलकर्णी, आळंदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर, डी. डी. भोसले, मारुती कोकाटे, ज्ञानेश्वर गुळुंजकर, भीमराव घुंडरे, भाऊमहाराज फुरसुंगीकर, ज्ञानेश्वर वीर यांची प्रमुख उपस्थिती होती. विश्वस्त आणि मानकऱ्यांना नारळप्रसाद देण्यात आला. नंतर दुपारी माउलींच्या समाधीजवळ महानैवेद्याचा कार्यक्रम झाला.  

दर्शन रांगेत  मोफत खिचडी 
माउली देवस्थानच्या वतीने वारी काळात दर्शनाच्या रांगेतील भाविकांना मोफत खिचडीवाटपाचे उद्‌घाटन शुक्रवारी सकाळी प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे, अभय टिळक, पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर, सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com