‘संत तुकाराम’ची परंपरा कायम राहणार का?

Sugar-Factory
Sugar-Factory

वडगाव मावळ - श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष विदुरा नवले यांची इच्छा आहे. मात्र, दाखल झालेल्या अर्जांची संख्या व बदललेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता, कारखान्याची बिनविरोध निवडणुकीची परंपरा या वेळी कायम राहणार का, याबाबत मोठे औत्सुक्‍य निर्माण झाले आहे.

श्री संत तुकाराम कारखान्याची निवडणूक १६ फेब्रुवारीला आहे. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी २४८ अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर २११ अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज दाखल करणाऱ्यांत विद्यमान अध्यक्ष नवले यांच्यासह उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्यासह आजी-माजी संचालक व सर्वपक्षीय इच्छुकांचा समावेश आहे. हिंजवडी-ताथवडे गटातील तीन जागांसाठी २१, पौड-पिरंगुट गटातील तीन जागांसाठी २३, तळेगाव-वडगावतील तीन जागांसाठी २४, सोमाटणे-पवनानगरमधील तीन जागांसाठी ४९; तर खेड-शिरुर-हवेलीतील चार जागांसाठी ३६ जणांनी अर्ज आले आहेत.

महिलांसाठी राखीव दोन जागांसाठी १४, भटक्‍या विमुक्त एका जागेसाठी पाच, अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी सात व नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी तब्बल ३२ जणांनी अर्ज दाखल केलेले आहेत. या वेळी बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर इच्छुकांची संख्या वाढली आहे. 

बिनविरोध निवडणुकीची परंपरा
अपवाद वगळता संत तुकाराम कारखान्याच्या आतापर्यंतच्या सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. ही निवडणूकसुद्धा बिनविरोध व्हावी, अशी संस्थापक-अध्यक्ष नवले यांची इच्छा आहे. त्यासाठी ते प्रयत्नशीलसुद्धा आहेत. निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठकही आयोजित केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रयत्न या बैठकीत झाला; परंतु दाखल झालेल्या अर्जांची संख्या व बदललेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता, त्यात कितपत यश येते याबाबत औत्सुक्‍य आहे.

राज्य सरकार बदललेले आहे. मावळ तालुक्‍यातही फेरबदल झाला असल्याने काही नेत्यांचा निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत; तर काही नेते ती होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहेत. चार फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. माघारीसाठी बारा दिवसांचा अवधी असल्याने बिनविरोध करण्यासाठी निश्‍चित प्रयत्न होतील; परंतु पुढाकार घेणाऱ्या नेत्यांना उमेदवारी अर्ज दाखल केलेले इच्छुक कसा प्रतिसाद देतात, त्यावरच बिनविरोध निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com