श्रीगुरू तांबे यांनी आयुर्वेदाला समाजाभिमुख केले - डुंबरे 

श्रीगुरू तांबे यांनी आयुर्वेदाला समाजाभिमुख केले - डुंबरे 

पुणे - ""श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल्या उपदेशाची भगवद्‌गीता झाली. हीच संस्कृतमधील गीता संत ज्ञानेश्‍वरांनी सर्वसामान्यांना समजावी म्हणून समाजापुढे प्राकृत भाषेत ज्ञानेश्‍वरीतून आणली. त्याच तोडीचे आयुर्वेदाला समाजाभिमुख करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य श्रीगुरू बालाजी तांबे यांनी केले आहे,'' असे गौरवोद्‌गार अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाच्या कायाचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. सतीश डुंबरे यांनी काढले. 

आत्मसंतुलन व्हिलेज (कार्ला) येथे आयोजित संतुलन गर्भसंस्कार पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. श्रीगुरू बालाजी तांबे, "सकाळ माध्यम समूहा'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सुनील तांबे, डॉ. मालविका तांबे, डॉ. भाग्यश्री झोपे आदी उपस्थित होते. "नवशक्ती' पुरस्कृत गर्भसंस्कार पुरस्काराने तेजस व प्रियांका देशपांडे (कुमार स्वरूप) यांना (प्रथम), हृषिकेश व ऐश्‍वर्यलक्ष्मी करळे (कुमारी गिरिजा) यांना (द्वितीय), सचिन व पूजा देव (कुमारी सई) यांना (तृतीय क्रमांक) सन्मानित करण्यात आले. 

डॉ. डुंबरे म्हणाले, ""आयुर्वेदात गर्भसंस्कार हे तुलनेने दुर्लक्षित ज्ञान होते. पण श्रीगुरू तांबे यांनी काळाची व नवीन पिढीची गरज ओळखून आयुर्वेदातील गर्भसंस्काराला चालना दिली. हेच त्यांचे सगळ्यात मोठे कार्य आहे. आयुर्वेद ही जीवनशैली आहे, हे ओळखणाऱ्यांमध्ये श्रीगुरू हे अग्रणी आहेत. आम्ही महाविद्यालयातून पुस्तकी ज्ञान देतो. श्रीगुरू यांनी महाराष्ट्रातील घराघरांत आयुर्वेद पोचवून आयुर्वेदाची प्रतिष्ठा वाढविण्याचे महत्त्वाचे कार्य केलेले आहे. गर्भसंस्कारावर पुस्तक लिहून त्यांनी आयुर्वेदावर उपकारच केले आहेत.'' 

श्रीगुरू तांबे म्हणाले, ""एकसारखे वातावरण, एकसारखी औषधे, एकसारखा कौटुंबिक स्तर असे असूनही मुले वेगवेगळी झालेली दिसतात. हा आसपासच्या वातावरणाचा परिणाम असतो. याबाबत आयुर्वेदाने नोंदविलेली निरीक्षणे आणि आधुनिक परिणामशास्त्र हे एकाच पद्धतीने विचार करतात. या दृष्टीने केले जाणारे गर्भसंस्कार सहाव्या वर्षापर्यंत टिकतात. पुढे अकरा वर्षापर्यंत पालकांकडून संस्कार होतात. विसाव्या वर्षापर्यंत गुरुजनांच्या संस्कारात मुले असतात. नंतर समाजातून संस्कार होतो. हे लक्षात घेता केवळ गर्भसंस्कार करून पालकांनी संतुष्ट राहू नये, तर संपूर्ण झाड विकसित कसे होईल, याचा प्रयत्न करावा. देश सुसंस्कृत व्हावा असा सरकारचा प्रयत्न असतो. यासाठी उगवत्या पिढीवर संस्कार करणे महत्त्वाचे असते. लहान मुले निरागस असतात. पण त्यांची काळजी घ्यायची आहे. मुलांवर मानवतेचे चांगले संस्कार करायचे आहेत, अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. आयुर्वेदातील गर्भसंस्कारांमुळे मुलांवर चांगले संस्कार होतात. कारण गर्भसंस्काराचे सूत्रबद्ध कार्य आयुर्वेदात वर्णिले आहे.'' 

पवार म्हणाले, ""मुरारी बापूंनी म्हटले आहे की, गर्भसंस्कार, घरातले संस्कार, शालेय व समाजातले संस्कार मुलांवर होत असतात. खरंतर भावी पिढी सुसंस्कृत, सुदृढ होणे हाच गर्भसंस्काराचा उद्देश होय. ही भावी पिढी जशी मोठी होईल, तशी समाजासाठी व देशासाठी सुवर्णकाळ तयार करेल, असा मला विश्‍वास आहे.'' 

श्रीगुरू तांबे यांच्या स्नूषा डॉ. मालविका तांबे या सूत्रसंचालन करताना म्हणाल्या, ""श्रीगुरू यांनी लिहिलेल्या आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकाच्या सात लाख प्रती खपल्या आहेत. आयुर्वेदीय गर्भसंस्काराचे महत्त्व समजून घेण्यासाठी पारंपरिक पद्धती जाणून घेण्याची गरज आहे.'' सुनील तांबे यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com