पुण्यात लाखोंचा जनसागर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

पुणे - अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ऍट्रॉसिटी) बळकट करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी पुण्यात आयोजित केलेल्या संविधान सन्मान मूक मोर्चात राज्याच्या विविध भागांतून आलेले लाखो नागरिक सहभागी झाले होते. पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर सकाळपासून उसळलेला जनसागर सायंकाळपर्यंत कायम होता. सर्व समाजांतील मुलींच्या हस्ते जिल्हाधिकारी सौरभ राव यांना मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर विधान भवनाच्या परिसरात राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला. महिला, युवती आणि मुस्लिम समाजातील बांधवांची लक्षणीय उपस्थिती, हे मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले.

मोर्चाच्या सुरवातीला अपंगांची वाहने, त्यापाठोपाठ युवती होत्या. त्यानंतर महिला आणि बौद्ध धर्मगुरू होते. लाखोंची गर्दी असूनही शिस्तबद्ध पद्धतीने हा मूक मोर्चा निघाला. या मोर्चाबद्दल कुतूहल असल्यामुळे मोर्चाच्या मार्गावर नागरिकांचीही मोठी गर्दी होती. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दुपारी साडेबारा वाजता मोर्चाला सुरवात झाली. शहरातील रस्ते मोर्चासाठी सकाळी टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले होते. राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून आलेले नागरिक, तरुणांचे लोंढे खंडूजी बाबा चौकात दाखल होत होते. बौद्ध धर्मगुरू, अभ्यासकांसह सर्व राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. दुपारी तीनच्या सुमारास विधान भवनावर मोर्चा पोचला. तेथे युवतींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यात "मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी नेमकी व्हावी, मागासवर्गीयांना संरक्षण देणाऱ्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, सच्चर आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी' आदी मागण्यांचा समावेश होता.

पुणे जिल्ह्यासह नगर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, जळगाव येथून बहुसंख्य नागरिक मोर्चात सहभागी होण्यासाठी आले होते. मोर्चादरम्यान मुस्लिम समाजातील बांधवांनी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. मोर्चा संपल्यावर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर कचरा राहणार नाही, याची खबरदारी घेतली. पोलिस बंदोबस्त काटेकोर असल्यामुळे कोठेही अनुचित घटना घडली नाही.

मोर्चातील प्रमुख मागण्या

  • "ऍट्रॉसिटी' कायद्याची कडक अंमलबजावणी करा
  • "ऍट्रॉसिटी'च्या खटल्यांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करा
  • खैरलांजीसह सर्व बलात्कार प्रकरणांतील गुन्हेगारांना फाशी द्या
  • महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करा
  • या खटल्यांचे निकाल सहा महिन्यांमध्ये द्यावे
  • दलित कार्यकर्त्यांवरील खोटे खटले रद्द करा
  • मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण द्या
Web Title: Sanvidhan Sanman Muk Morcha in Pune