सारस्वत बॅंकेच्या "एमडी'पदी स्मिता संधाने

सारस्वत बॅंकेच्या "एमडी'पदी स्मिता संधाने

पुणे - सारस्वत को-ऑप. बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) बॅंकेच्या वरिष्ठ अधिकारी स्मिता संधाने यांची 1 एप्रिल 2017 पासून नियुक्ती झाली आहे. सौ. संधाने या बॅंकेच्या इतिहासातील व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त झालेल्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.

बॅंकेचे मावळते व्यवस्थापकीय संचालक एस. के. बॅनर्जी यांच्याकडून 31 मार्च 2017 रोजी त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर सौ. संधाने यांनी या पदाची सूत्रे हाती घेतली. सौ. संधाने यांची या बॅंकेसोबत 35 वर्षांची यशस्वी कारकीर्द आहे. त्या 1982 रोजी बॅंकेत रुजू होऊन निरनिराळी उच्चपदे भूषवत ऑगस्ट 2016 मध्ये सहव्यवस्थापकीय संचालिका म्हणून नियुक्त झाल्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत बॅंकेच्या शाखा, विभाग, परिमंडल अशा निरनिराळ्या कार्यान्वित क्षेत्रात काम केले आहे. तसेच बॅंकेच्या होलसेल बॅंकिंग, प्लॅनिंग, अकाउंट्‌स व स्ट्रेस्ड्‌ ऍसेट्‌स या क्षेत्रांच्या विभागप्रमुख म्हणूनही काम पाहिले आहे. बुडीत असलेल्या तीन बॅंकांचे सारस्वत बॅंकेत यशस्वीरीत्या विलीनीकरण करताना त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. तोट्यात असलेल्या बॅंका नफ्यात आणण्यासाठी, तसेच त्या बॅंकांचे सारस्वत बॅंकेत सहजरीत्या विलीनीकरणासाठी त्यांनी विविध योजना आखल्या. या बॅंकांच्या थकीत कर्जांच्या खात्यांची जास्तीत जास्त वसुली करण्यासाठीदेखील त्यांनी विशेष मेहनत घेतली होती.

व्यवस्थापकीय संचालकपदी पदोन्नती होण्यापूर्वी त्यांनी बॅंकेच्या "सीएफओ' म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली होती. त्याबद्दल त्यांना "सीएफओ 100 रोल ऑफ ऑनर' या पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलेले आहे. सौ. संधाने या नॅशनल पेमेंट्‌स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एनपीसीआय) मंडळावर संचालिका म्हणून कार्यरत आहेत. नॉनपरफॉर्मिंग ऍसेट्‌स (एनपीए) या पुस्तकाच्या त्या सहलेखिका आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com