Sasoon Hospital : ‘ससून’च्या प्रशासनाला जाग; रुग्णालयातील कैदी होणार ‘क्लीन आउट’

खडबडून जागे झालेल्या ससून रुग्णालय प्रशासनाने अत्यावश्यक असलेल्याच कैद्यांना रुग्णालयात उपचारांसाठी ठेवण्याची ‘क्लीन आउट’ मोहीम हाती घेतली आहे.
Sasoon Hospital
Sasoon Hospitalsakal

पुणे - खडबडून जागे झालेल्या ससून रुग्णालय प्रशासनाने अत्यावश्यक असलेल्याच कैद्यांना रुग्णालयात उपचारांसाठी ठेवण्याची ‘क्लीन आउट’ मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत दोन रुग्णांची रवानगी पुन्हा कारागृहात करण्यात आली आहे. अमली पदार्थांच्या तस्करीतील प्रमुख सूत्रधार ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाला.

या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयात कैद्यांना मिळत असलेल्या ‘विशेष’उपचारांची माहिती उघड झाली. त्यानंतर ससून रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी कैदी रुग्णालयातून परत कारागृहात पाठविण्याची ‘क्लीन आउट’ मोहीम सुरू केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

कोणाला कारागृहात पाठविले?

ससून रुग्णालयात उपचारासाठी २४ ऑगस्टपासून दाखल असलेल्या कैद्याला परत कारागृहात पाठविण्यात आले आहे. त्याला हार्निया उपचारासाठी दाखल केले होते. त्याच्यावर यापूर्वीच शस्त्रक्रिया झाली आहे. तसेच आणखी एका महिलेलाही रुग्णालयातून परत पाठविण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

काय आहे मोहीम?

ससून रुग्णालयात दाखल कैद्यांच्या आरोग्याची माहिती आता त्यांच्यावर उपचार करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरांकडून मागविण्यात येत आहे. आतापर्यंत आठ कैद्यांची माहिती मागविली आहे. रुग्णालयात ठेवलेल्या कैद्यांचे नेमके निदान काय झाले आहे, त्यांच्यावर उपचार कोणते करण्यात येत आहेत, त्याच्याबाबतच्या तपासण्या कोणत्या केल्या आहेत आणि कोणत्या प्रलंबित आहेत, अशा माहितीची त्यात समावेश आहे. ‘क्लीन आउट’ मोहिमअंतर्गत अत्यावश्यक असेल तरच दाखल करा, अशी स्पष्ट सूचना संबंधितांना रुग्णालय प्रमुखांनी दिल्याचे समजते.

कारागृहाकडून विलंब

रुग्णाच्या तपासण्यासाठी ज्याप्रमाणे जवळच्या नातेवाइकांची परवानगी लागते, त्याप्रमाणेच कैद्यांच्या रोगनिदान तपासण्या करण्यासाठी कारागृह प्रशासनाची मान्यता आवश्यक असते. रुग्णालयाने काही कैद्यांच्या तपासण्यांची परवानगी कारागृहाकडे मागितली आहे. मात्र मिळाली नसल्याने कैद्यांना रुग्णालयात ठेवावे लागत असल्याचे सांगण्यात आले.

अहवाल संचालकांना पाठविला

ललित पाटील या फरार कैद्याला कोणते आजार होते, कधी दाखल झाला होता, त्याच्यावर कोणते उपचार सुरू होते, याबाबतची माहिती असलेला अहवाल राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालकांकडे पाठविण्यात आल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली.

संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करा : धंगेकर

ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला कैदी तेथे अमली पदार्थांचे रॅकेट चालवत होता. पोलिसांनी पकडल्यावर तो तेथून पळून गेला. हा सारा घटनाक्रम संशयास्पद असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्राद्वारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

अमली पदार्थांच्या रॅकेटमध्ये आरोपी असलेला पाटील जर गंभीर आजारी होता, तर पोलिसांना हिसका देऊन कसा पळाला? तो आजारी होता, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. तसेच तो वेगवेगळ्या आजारांवर उपचार घेत होता, हेही संशयास्पद आहे. त्यामुळे हा सारा घटनाक्रम शासकीय यंत्रणेला चक्रवणारा आहे, असेही यात म्हटले आहे.

कारागृहातील कैदी वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली चक्क सरकारी रुग्णालयातून अमली पदार्थांचे रॅकेट चालवतो, हे अत्यंत धक्कादायक आहे. गोरगरिबांच्या उपचारासाठी असलेले सरकारी रुग्णालय आता कैद्यांचे आश्रयस्थान बनले की काय, असा प्रश्न पडतो.

पुण्यातील तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात सापडत जाणे, ही चिंतेची बाब आहे. अमली पदार्थांची विक्री करण्याची परवानगी नाही. कोणत्याही व्यसनाचे उदात्तीकरण व त्याला प्रतिष्ठेचे बनवणे हे धोकादायक आहे. तरुणांचे भविष्य वाचवण्यासाठी अमली पदार्थ विकणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

- विनायक फडतरे, नागरिक, पर्वती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com