'ससून'मधील वैद्यकीय सेवा "पॅरलाइज'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

निवासी डॉक्‍टर बेमुदत रजेवर; आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू

निवासी डॉक्‍टर बेमुदत रजेवर; आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू
पुणे - सुरक्षेची हमी मिळेपर्यंत बेमुदत रजेवर गेलेल्या निवासी डॉक्‍टरांमुळे ससून रुग्णालयातील वैद्यकीय सेवा "पॅरलाइज' झाली आहे. यावर तोडगा न निघाल्यास मंगळवारीही (ता. 21) रुग्णालयातील रुग्णसेवा कोलमडण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, निवासी डॉक्‍टरांच्या या पवित्र्यामुळे रुग्णांचे होल होऊ नये, यासाठी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि अधिव्याख्यात्यांची मदत घेण्यात येत आहे.

राज्यातील 14 वैद्यकीय महाविद्यालयांतील सुमारे साडेचार हजार निवासी डॉक्‍टर बेमुदत रजेवर गेले आहेत. त्यापैकी 250 निवासी डॉक्‍टर पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील आहेत. त्यामुळे या महाविद्यालयाशी संलग्न ससून रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम झाला. सकाळी आठ वाजल्यापासून निवासी डॉक्‍टर कामावर रुजू झाले नाहीत. त्या बाबतचा रजेचा अर्ज त्यांनी रविवारी (ता. 19) रात्री अधिष्ठात्यांना दिला. त्यामुळे सोमवारी सकाळपासून ससून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना उपचारांसाठी डॉक्‍टरांची वाट पाहावी लागत होती.
पिंपरीवरून मुलाला उपचारासाठी घेऊन आलेल्या अनसूया गोतपागे म्हणाल्या, 'मुलाचा हात सुजल्याने सकाळी आठ वाजता उपचारासाठी घेऊन आले. येथील काही डॉक्‍टर कामावर नसल्याने एकच डॉक्‍टर तपासत आहे. त्यामुळे तपासायला वेळ लागेल, असे येथील लोक सांगत आहेत.''

महापालिकेच्या सोनवणे रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले होते. त्यांनी प्रसूतीसाठी ससून रुग्णालयात पाठविले. येथे आल्यानंतर डॉक्‍टर नसल्याचे सुरवातीला सांगितले. पण, वरिष्ठ डॉक्‍टरांनी इतर डॉक्‍टरांना बोलावले. त्यामुळे सकाळी साडेअकरा वाजता प्रसूती झाली, अशी माहिती सुखदा जमदाडे यांनी दिली.

महाराष्ट्र निवासी डॉक्‍टर संघटनेच्या (मार्ड) बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे सचिव डॉ. योगेश मगर म्हणाले, 'राज्यात गेल्या काही दिवसांपासून निवासी डॉक्‍टरांवर सातत्याने हल्ले होत आहेत. त्यामुळे रुग्णसेवेसाठी सुरक्षित वातावरण राहिलेले नाही. हे सुरक्षित वातावरण मिळेपर्यंत निवासी डॉक्‍टरांनी बेमुदत रजा घेतली आहे. कामाच्या ठिकाणी असलेल्या असुरक्षित वातावरणामुळे प्रत्येक निवासी डॉक्‍टरांनी रजा घेतली आहे. त्यात "मार्ड'चा कोणताही सहभागी नाही.''

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, 'महाविद्यालयातील 145 निवासी डॉक्‍टर कामावर रुजू झाले आहेत. प्रत्येक विभागाचे प्रमुख, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि अधिव्याख्याता यांच्या मदतीने रुग्णसेवा कार्यान्वित ठेवली आहे. मात्र, काही नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू आहे.''

नातेवाइकांसाठी पासची व्यवस्था
महाविद्यालय आणि ससून रुग्णालय परिसरामध्ये 115 सुरक्षारक्षक तैनात आहेत. मात्र, एका रुग्णाबरोबर सात ते आठ नातेवाईक असतात. प्रत्येक नातेवाईक रुग्णाच्या प्रकृतीची माहिती डॉक्‍टरांना विचारत असतो. त्यातून निवासी डॉक्‍टर असुरक्षित होतात. त्यासाठी रुग्णालयात दाखल रुग्णांना भेटण्यासाठी संध्याकाळी पाच ते सात ही वेळ निश्‍चित केली आहे. तसेच, रुग्णाजवळ थांबण्यासाठी नातेवाइकांना पास देण्याची व्यवस्था केली आहे. पासशिवाय कोणताही नातेवाईक रुग्णाजवळ जाणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती डॉ. चंदनवाले यांनी दिली.

Web Title: sasoon hospital medical service colapse