esakal | ऑक्सिजन वितरणातील दिरंगाईमुळे ससून ‘गॅस’वर
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen Tanker

ऑक्सिजन वितरणातील दिरंगाईमुळे ससून ‘गॅस’वर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ससून रुग्णालयात मागणीपेक्षा कमी ऑक्सिजनचा पुरवठा झाला. रुग्णालयात दाखल असलेल्या पाचशे रुग्णांना जेमतेम काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक राहील. त्यानंतर काय होईल, या भयंकर कल्पनेनेही व्यवस्थेतील प्रत्येकाच्या अंगावर शहारा उमटला. सर्व चक्रे वेगाने फिरली आणि पहाटे साडेतीन वाजता ऑक्सिजनचा टँकर रुग्णालयात आला...

ससून रुग्णालयात पाचशेहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील बहुतांश रुग्ण अत्यवस्थ आहेत. त्यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करावे लागते. गुंतागुंतीच्या स्थितीनंतर रुग्ण या रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे इतर रुग्णांपेक्षा त्यांना ऑक्सिजनची जास्त गरज लागते.

गेल्या आठवड्यापासून दाखल रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. शहरातील इतर रुग्णालयांमध्ये जागा मिळत नसल्याने ते ससून रुग्णालयात दाखल होतात. यातील बहुतांश रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवावे लागते. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी सातत्याने वाढत आहे. ससून रुग्णालयात सद्यःस्थितीत दररोज ३२ किलोलिटर ऑक्सिजनची गरज आहे. आयनॉक्स या वितरकातर्फे रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवण्यात येतो. दररोज १६ किलोलीटरच्या दोन टँकरमधून ऑक्सिजन रुग्णालयातील टाक्यांमध्ये भरला जातो. शुक्रवारी संध्याकाळी फक्त आठ किलोलिटर ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णालयाला झाला. पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा टाक्यांमध्ये शिल्लक होता.

हेही वाचा: फायर सेफ्टी ऑडिट करून घ्या! पुण्यातील रुग्णालयांना आदेश

रुग्णालय प्रशासनाने वारंवार पाठपुरावा करूनही ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे चार तासांनंतर या पाचशे रुग्णांना ऑक्सिजन द्यायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला. याबाबत जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यांच्याशी तातडीने संपर्क साधण्यात आला. एकेक मिनीट हा या सगळ्या प्रक्रियेत मोलाचा होता. प्रत्येक मिनिटाला रुग्णालयाच्या टाकीतील ऑक्सिजनची पातळी खाली होत होती.

प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने आदेश दिल्यानंतर रात्री पावणेबाराच्या सुमारास १६ किलोलिटरच्या टँकरमध्ये ऑक्सिजन भरायला सुरुवात झाली. हा टँकर भरण्यासाठी दीड ते दोन तास लागले. ऑक्सिजनने भरलेला हा टँकर हळूहळू आणावा लागतो. त्यामुळे रिफिलिंग स्टेशन ते ससून रुग्णालयापर्यंतचा प्रवास तब्बल दोन तासांचा झाला. अखेर पहाटे साडेतीन वाजता टँकर ससून रुग्णालयात पोहचला. त्यावेळी सगळ्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

जम्बो सिलिंडरची व्यवस्था

रुग्णालयाच्या टाकीतील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागल्यानंतर तातडीने अत्यवस्थ रुग्णांजवळ जम्बो सिलिंडर ठेवण्यात आले. रुग्णालयात असलेले सगळे सिलिंडर त्यासाठी तातडीने हलविण्यात आले. ही पर्यायी व्यवस्थाही प्रशासनाने वेळीच करून ठेवली होती.

loading image