
सासवड गावात रुग्णसंख्या 14 झाल्याने चिंता वाढली; तालुका पोचला 31 वर
सासवड (जि. पुणे) : शहरात कोरोनाची बाधा झालेले काल चार रुग्ण सापडल्याने आज सासवड शहर पूर्णतः सील झाल्यासारखे आहे. मेडिकल व दवाखाने आदी जीवनावश्यक बाबी वगळता पूर्णतः बंद आहे. बाजारपेठेतील व्यापारी, लोकप्रतिनिधी वा पदाधिकारी, त्यांच्या घरातील लोक कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्याने आता मात्र शहरातील लोक पहिल्यांदाच कमालीचे चिंताग्रस्त झाले आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
तहसीलदार रुपाली सरनौबत यांच्या माहितीनुसार रात्री पुन्हा पिंगोरी गावात मुंबईतून आलेली एक महिला पाॅझीटिव्ह सापडली. म्हणजेच गेल्या चोवीस तासात रुग्ण संख्या पाचने वाढली. त्यातून एकट्या सासवड शहरातील रुग्ण संख्या 14 वर पोचली व चिंता प्रचंड वाढली आहे. तर तालुक्यातील एकुण पाॅझीटिव्ह रुग्ण संख्या 31 वर पोचल्याने संसर्गाचा धोका आणखी वाढत असल्याचे स्पष्ट आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सासवडच्या एकुण 14 रुग्ण संख्येत 9 रुग्ण या पाच दिवसातील आहेत. म्हणजेच संसर्गाचा वेग वाढल्याचे स्पष्ट आहे. 31 रुग्णांमधील बहुतेक बाधित रुग्ण हे मुंबई-पुणे कनेक्शनमधीलच आहेत. हाच धोका वाढतोय.. तरीही अजूनही मुंबईहून कुटुंबासह गावाकडे येणे थांबलेले नाही. पुण्यात ये-जा करणारे तर शेकडो जण असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लोकांमध्ये न मिसळण्याची काळजी घ्यावी लागेल. अन्यथा सासवड पुण्याजवळ असल्याने धोका आणखी समोर दिसत आहे; असे जाणकार व काही डाॅक्टरांकडून सांगण्यात आले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान, कोविड केअर सेंटरमध्ये संस्थात्मक क्वारंटाइन व होम क्वारंटाइन केलेल्यांची सासवड शहरात संख्याही मोठी आहे. या क्वारंटाइन असलेल्या लोकांनी बाहेर फिरु नये; अशा स्पष्ट सूचना आहेत. कोविड विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून पुरंदर तालुक्यात प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
सासवड व पिंगोरीला रुग्ण सापडलेल्या ठिकाणी लगेच सर्व्हे व पुढील कार्यवाही होत आहे; असे सांगण्यात आले. तसेच तालुक्यात एकूण 31 कोरोनाग्रस्त रुग्णापैकी तीन रुग्ण मयत झालेले आहेत. तसेच 9 रुग्णांना घरी सोडण्यात आलेले आहेत. उर्वरित 19 कोरोनाग्रस्त रुग्ण हे पुण्यात विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.