सातारा रस्त्याची कामे सुरू

सारोळा (ता. भोर) - पुणे-सातारा रस्त्यावरील उड्डाण पुलाचे सुरू असलेले काम.
सारोळा (ता. भोर) - पुणे-सातारा रस्त्यावरील उड्डाण पुलाचे सुरू असलेले काम.

खेड शिवापूर - पुणे-सातारा रस्त्याचे दिलेल्या आराखड्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे. सारोळा आणि कामथडी येथील उड्डाण पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे, असे रिलायन्स इन्फ्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आराखड्याप्रमाणे ते वेळेत पूर्ण करण्याची हमी रिलायन्स इन्फ्राने द्यावी, अशी मागणी शिवसेना सहसंपर्क प्रमुख कुलदीप कोंडे यांनी केली आहे.

पुणे-सातारा रस्त्याचे उर्वरित काम जुलै २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असा आराखडा रिलायन्स इन्फ्राने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास सादर केला होता. त्यानुसार गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प असलेले पुणे-सातारा रस्त्याचे काम सुरू झाले आहे. सध्या कामथडी आणि सारोळा येथील उड्डाण पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. कामथडी येथील उड्डाण पूल पंधरा दिवसांत तर सारोळा येथील उड्डाण पूल येत्या महिनाभरात वाहतुकीसाठी खुला होईल, असे रिलायन्स इन्फ्राने सांगितले.

सध्या खेड शिवापूर टोल नाका ते सारोळा या टप्प्यात काम सुरू आहे, तर शिंदेवाडी ते टोल नाक्‍यादरम्यानचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जी कामे अनेक दिवसांपासून रखडलेली आहेत, त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त घेऊन ती कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील.
- बी. के. सिंग, सहव्यवस्थापक, रिलायन्स इन्फ्रा

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामातील अडचणी दूर करून ती कामे प्राधान्याने पूर्ण करावीत; अन्यथा भविष्यात ही रखडलेली कामे पुढे करून रिलायन्स इन्फ्रा रस्त्याचे काम पुन्हा थांबवू शकते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांनी स्थानिकांच्या अडचणी सोडवून रस्त्याचे काम आराखड्यातील कालावधीत पूर्ण करण्याची हमी द्यावी.
- कुलदीप कोंडे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख 

प्राधान्याने पूर्ण करावयाची कामे
 शिंदेवाडी ते सारोळादरम्यानचे रखडलेले सेवारस्ते
 वेळू, खेड शिवापूर, वरवे, चेलाडी, धांगवडी येथील उड्डाण पूल
 ड्रेनेज आणि रस्त्यालगतच्या गावच्या पाणीपुरवठा पाइपलाइन
 पथदिव्यांची उभारणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com