सोमेश्वरच्या सत्ताधाऱ्यांविरोधात सतीश काकडे यांनी थोपाटले दंड 

संतोष शेंडकर
Friday, 28 August 2020

सोमेश्वर कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक सुभाष धुमाळ हे 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. परंतु, कारखान्याने अद्याप पदभरतीची जाहिरात दिलेली नाही. उलट अध्यक्ष त्यांना मुदतवाढ देण्याच्या तयारीत आहेत

सोमेश्वरनगर (पुणे) : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयीन अधीक्षकांना संचालक मंडळाने निवृत्तीनंतर मुदतवाढ देण्याचा चालवलेला प्रयत्न बेकायदेशीर आहे. साखर आयुक्तालयाच्या निर्देशानुसार तसे करता येत नाही. यानंतरही मुदतवाढ दिल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल, असा इशारा शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी दिला आहे. याबाबत साखर आयुक्तांनाही तक्रार दिली आहे.

पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली, खडकवासला प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत जादा पाणीसाठा

सोमेश्वर कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक सुभाष धुमाळ हे 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. परंतु, कारखान्याने अद्याप पदभरतीची जाहिरात दिलेली नाही. उलट अध्यक्ष त्यांना मुदतवाढ देण्याच्या तयारीत आहेत, असा आरोप करत काकडे यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव व राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना तक्रार करत मुदतवाढ देऊ नये, अशी मागणीही केली आहे. 

बारामतीकरांसाठी मोठी बातमी, टोलबाबत राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

कारखान्याचे नुकतेच सेवानिवृत्त झालेले वित्त व्यवस्थापक बाळासाहेब कदम यांना मुदतवाढ देण्यासंबंधी संचालक मंडळात मतभेद झाले होते. त्यावर साखर आयुक्तालयाने मुदतवाढ देणे नियमबाह्य असल्याचे स्पष्ट केले होते. परिणामी कदम यांना सेवानिवृत्त व्हावे लागले. धुमाळ यांनाही तोच कायदा लागू व्हावा. तसेच, धुमाळ यांनी सरकारी मंजुरी नसताना डिसेंबर 2013 ते जुलै 2015 या कालावधीमध्ये कारखान्याचे कार्यकारी संचालकपदही उपभोगले होते. या काळात कारखान्याचे अधिकारी-कर्मचारी व सभासद यांना वाईट वागणुक देत होते. तसेच, कृती समितीने केलेल्या पत्रव्यवहारावर उत्तरेही देत नव्हते. यावर कृती समितीने साखर आयुक्त यांना तक्रार केल्यावर धुमाळ यांचे काम बेकायदेशिर असल्याचे सांगत सरकारी पॅनलवरील कार्यकारी संचालक घेण्याचे आदेश दिले होते. संचालक मंडळाच्या सहकार्याने हा आदेशही धुमाळ यांनी झुगारला होता. त्यामुळे 29 जुलै 2020 रोजी लेखी खुलासा मागितला. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कार्यकारी संचालक यांनी 10 ऑगस्ट रोजी दिलेल्या खुलाशात धुमाळ यांनी उत्कृष्ट काम केल्याचा निर्वाळा देत निवडणूक असल्याने नवीन कार्यकारी संचालक भरणे शक्य झाले नसल्याचे नमूद केले. कार्यकारी संचालक व अध्यक्षांनी अशा प्रकारे धुमाळ यांची जाणीवपूर्वक मर्जी राखली असल्याचा आरोप काकडे यांनी केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satish Kakade's warning to the authorities of Someshwar Sugar Factory