अजित पवारांवरील प्रेमापोटी बारामतीचा 'आयर्नमॅन' धावला नॉनस्टॉप १०० कि.मी.!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 July 2020

ज्येष्‍ठ नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमत्त त्यांनी तिरुपती बालाजी ते बारामती हे 1100 किलोमीटरचे अंतर सायकलवर विक्रमी 52 तासांत पूर्ण केले आहे.

बारामती (पुणे) : ध्येयनिश्चिती असेल तर काहीही अशक्य नसते ही बाब बारामतीचे 'आयर्नमॅन' सतीश ननवरे यांनी सिद्ध करून दाखवली आहे. दोन वेळा आयर्नमॅनची खडतर स्पर्धा पूर्ण केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सतीश यांनी रविवारी (ता.२६) पुणे ते बारामती हे शंभर कि.मी.चे अंतर नॉनस्टॉप धावत पूर्ण केले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अजित पवार यांना दीर्घायू लाभावे, या उद्देशाने त्यांनी हे अंतर पहाटे चार ते दुपारी चार असे बारा तासात पूर्ण केले. व्यायाम करा आणि निरोगी राहा हा संदेशच त्यांनी या माध्यमातून बारामतीकरांपर्यंत पोहोचविला. सारसबागेपासून त्यांनी या उपक्रमाचा प्रारंभ केला. यासाठी त्यांनी गेले काही दिवस अथक परिश्रम केले होते. 

पुणे जिल्हा परिषदेने खाजगी हॉस्पिटलशी करार करावा; वळसे-पाटील यांनी का केली मागणी?​

दरम्यान अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांनी सतीश ननवरे यांना पुष्पगुच्छ देत सदिच्छा दिल्या. 
सतीश ननवरे यांनी या पूर्वी दोनदा ‘आयर्नमॅन’ हा किताब मिळवला आहे. आता ते त्याहून खडतर समजल्या जाणा-या अल्ट्रामॅन या स्पर्धेची जोरदार तयारी करीत आहेत. 
यापूर्वी त्यांनी अष्टविनायक यात्राही विक्रमी वेळेत दौड करुन पूर्ण केली आहे. ज्येष्‍ठ नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमत्त त्यांनी तिरुपती बालाजी ते बारामती हे 1100 किलोमीटरचे अंतर सायकलवर विक्रमी 52 तासांत पूर्ण केले आहे. 

कॅनॉलमध्ये वाहत चाललेल्या 'त्या' मायलेकींच्या मदतीला धावला देवदूत!​

बारामतीमधील युवकांमध्ये सायकल, धावणे आणि व्यायामाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने सतीश ननवरे यांनी आता युवकांना याबाबत मार्गदर्शनही सुरु केले आहे. अनेक युवक आणि काही व्यावसायिकही आयर्नमॅन स्पर्धेची सध्या तयारी करीत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satish Nanavare ran 100 km from Pune to Baramati