दरीत उडी मारलेल्या युवतीला वाचविले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

काळ्याकुट्ट अंधारात खोल दरीत उडी मारलेली एकवीस वर्षांची युवती झुडपांत अलगद अडकून होती. शोध घेणाऱ्या पोलिसांचा एकसारखा पुकारा सुरू होता, "घाबरू नको, आम्ही तुला वाचविण्यासाठी आलो आहोत.

कात्रज - काळ्याकुट्ट अंधारात खोल दरीत उडी मारलेली एकवीस वर्षांची युवती झुडपांत अलगद अडकून होती. शोध घेणाऱ्या पोलिसांचा एकसारखा पुकारा सुरू होता, "घाबरू नको, आम्ही तुला वाचविण्यासाठी आलो आहोत. बॅटरीच्या प्रकाशाने बाहेर ये.' मात्र, समोर रानडुकरांचा कळप तिला बाहेर पडू देत नव्हता! दोन तासांनंतर तो कळप जंगलात मार्गस्थ झाला आणि ती जंगलातून बाहेर आली. त्यानंतर पोलिसांनी तिला दरीतून सुखरूप बाहेर काढले. 

धनकवडी येथे राहणाऱ्या या युवतीचा आई-वडिलांशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. तापट स्वभावाची असल्याने ती घराबाहेर पडली आणि कात्रज घाटाच्या दिशेने चालू लागली. त्या वेळी तिला एका ओळखीच्या इसमाने पाहिले. त्याने याबाबत तिच्या वडिलांना माहिती दिली. त्यानंतर तिचे वडील व नातेवाईक तत्काळ कात्रज घाटात दाखल झाले. वडिलांनी समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, ती कुणाचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. त्यानंतर घाटातील जुन्या बोगद्यासमोरील कठड्यावरून मंगळवारी रात्री तिने उडी मारली. यामुळे घाबरून गेलेल्या वडिलांनी दरीत उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र तीव्र उतार, अंधार आणि दाट जंगल असल्यामुळे तेदेखील हतबल झाले. त्यांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. 

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस फौजदार सुबराव लाड आणि पोलिस नाईक बालाजी घंटे हे घटनास्थळी पोचले. त्यांच्यापाठोपाठ सहायक पोलिस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी, यशवंत गांडले, परशुराम पिसे, दत्तू खेडकर, सोमनाथ केसरे व नगराळे यांच्या पथकासह कात्रज अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी पोहचले. दोराच्या साह्याने सातशे फूट खोल दरीत उतरून साडेनऊ वाजल्यापासून तब्बल तीन तास पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तिचा शोध घेण्यासाठी शर्थ केली. मात्र, दरीतून कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. 

पोलिसांनी त्यानंतर एनडीआरएफला याबाबत माहिती दिली. परंतु, त्यांना घटनास्थळी पोचण्यास वेळ होणार होता. हे ओळखून पोलिसांनी आपले शोधकार्य जोमाने सुरूच ठेवले. पोलिसांनी गाडीवरील स्पीकरच्या साह्याने त्या युवतीला, "आम्ही तुला वाचविण्यासाठी आलो आहोत. तू घाबरू नको' असे सांगितले. त्यानंतर अखेर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ती युवती बॅटरीच्या प्रकाशात आली. ती सुखरूप असल्याचे पाहून शोधण्याची पराकाष्ठा करणाऱ्या पोलिसांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्यानंतर तिला वडिलांकडे सुपूर्त करण्यात आले. 

Web Title: Save the girl who jumped into the valley in Katraj Ghat

टॅग्स