#University Canteen आंदोलन करणाऱ्या बारा विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोजनालयात (रिफेक्‍टरी) खराब जेवण मिळत असल्याच्या कारणावरून बेकायदा आंदोलन आणि विद्यापीठाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व मारहाण केल्याप्रकरणी बारा विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोजनालयात (रिफेक्‍टरी) खराब जेवण मिळत असल्याच्या कारणावरून बेकायदा आंदोलन आणि विद्यापीठाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व मारहाण केल्याप्रकरणी बारा विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी भुरसिंह राजपूत (वय ५५, रा. विनायकनगर, नवी सांगवी) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सतीश गोरे, सतीश पवार, अजय चौधरी, विकास खंडागळे, सचिन लांबुट, आकाश डोंडे, आकाश भोसले, मुन्ना आरडे, सोमनाथ लोहार, कुणाल सपकाळ, नंदू हांगे यांच्यासह बारा विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी राजपूत हे विद्यापीठामध्ये सुरक्षा विभागाचे प्रमुख आहेत. फिर्यादी व त्यांच्या महाराष्ट्र सिक्‍युरिटी फोर्सचे कर्मचारी सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजता विद्यापीठामध्ये कामावर होते. विद्यार्थ्यांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बेकायदेशीररीत्या जमाव जमवून घोषणाबाजी करून गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यांनी भोजनालयामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, त्या वेळी फिर्यादी व अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी संबंधीत पाच विद्यार्थ्यांनी सुरक्षा कर्मचारी केंचप्पा खांडेकर, किरण माने, अशोक परभणे यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यामध्ये फिर्यादी जखमी झाले. 

Web Title: savirtribai phule pune university filing a complaint twelve students