विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : पुणे विद्यापीठाच्या 'या' ३ अभ्यासक्रमांसाठीची प्रवेशप्रक्रिया सुरू!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

विज्ञान, कला, मानव्यविद्या अशा विविध विद्याशाखांमधील अनेक विषयांची एकमेकांशी सांगड घालणारा, तसेच गरज आणि आवडीनुसार विषय निवडण्याचे स्वातंत्र्य देणारा 'लिबरल आर्ट्स' हा अभ्यासक्रम जगभरात वेगाने लोकप्रिय होत आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गेल्या वर्षीपासून विविध विषय आणि विद्याशाखांमधील आंतरसंबंध समजून घेऊन, प्रत्यक्षातील प्रश्नांची समग्र उत्तरे शोधण्यावर भर देणारे बी.ए. (लिबरल आर्ट्स), बी.एस्सी. ब्लेंडेड आणि मास्टर ऑफ डिझाइन हे तीन अभिनव अभ्यासक्रम गेल्या वर्षीपासून सुरु केले आहेत. विद्यापीठ आवारातील आंतरविद्याशाखीय प्रशाला (विज्ञान) अर्थात, 'आयडीएसएस' या विभागात हे तीन अभ्यासक्रम चालविले जातात. 

या अभ्यासक्रमांबाबत विशेष बाब म्हणजे राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचे अभ्यासक्रम सार्वजनिक विद्यापीठाच्या पातळीवर राबविले जात आहेत. बी.ए.(लिबरल आर्ट्स), बी.एस्सी.ब्लेंडेड या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा ऑगस्ट २०२० मध्ये आणि मास्टर ऑफ डिझाईन या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा सप्टेंबर २०२० मध्ये होणार असून त्यासाठीची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

 विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : आता तुमची दहावीची शाळा भरणार तुमचा अकरावीचा अॅडमिशन फॉर्म!​

बी.ए.(लिबरल आर्ट्स) हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतो. विज्ञान, कला, मानव्यविद्या अशा विविध विद्याशाखांमधील अनेक विषयांची एकमेकांशी सांगड घालणारा, तसेच गरज आणि आवडीनुसार विषय निवडण्याचे स्वातंत्र्य देणारा 'लिबरल आर्ट्स' हा अभ्यासक्रम जगभरात वेगाने लोकप्रिय होत आहे.

विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या नवीन शिक्षण धोरणामध्ये 'लिबरल आर्टस्'च्या शिक्षणावर जास्त भर देण्यात आला आहे. भविष्यातील पदवीपर्यंतचे शिक्षण हे मुख्यत्वे करून 'लिबरल आर्टस्'च्या तत्वांवर भर देऊन करण्यात यावे, अशी शिफारस या नवीन शिक्षण धोरणात करण्यात आलेली आहे. एखाद्या प्रश्नाकडे सर्वांगीण दृष्टिकोनातून बघण्याच्या शिकवणीमुळे लिबरल आर्ट्स शिक्षणाची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक उद्योगांत विशेषतः डिजिटल क्षेत्रातील उद्योगांत प्राधान्य मिळत आहे. 

मुख्य म्हणजे या अभ्यासक्रमात विविध क्षेत्रांना स्पर्श करणाऱ्या प्रमुख विषयांसोबतच, एका विषयाचा पदवी पातळीवर सखोल अभ्यास (मेजर) करण्याची सोय आहे. त्याखेरीज कौशल्य, अनुभव आणि प्रत्यक्ष प्रकल्पांवर आधारित विषय निवडीचीही त्यात संधी आहे. त्यामुळे एकाच वेळी पदवी पातळीवरचे भौतिकशास्त्र शिकताना भाषा, नाटक किंवा तत्त्वज्ञानही शिकण्याची अभिनव संधी विद्यार्थ्यांना मिळू शकते.

Big Breaking : सौरभ राव यांनी पुणे विभागीय आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला​

विज्ञानातील विविध विषयांचा समन्वय साधणे हे सूत्र मध्यवर्ती ठेवून बी.एस्सी. ब्लेंडेड या अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेला बसू शकतो. तीन वर्षांच्या या अभ्यासक्रमात पहिली दोन वर्षे विद्यार्थी विज्ञानातील विविध मूलभूत विषय शिकतील. शेवटच्या वर्षात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि भू-विज्ञान (अर्थ सायन्सेस) या चारपैकी एका विषयाचा पदवी पातळीवर सखोल अभ्यास (स्पेशलायझेशन) करता येईल.

या रचनेमुळे ब्लेंडेड अभ्यासक्रमात विज्ञानाचा प्रचलित बीएस्सी अभ्यासक्रमांपेक्षा अधिक व्यापक आणि समग्र पद्धतीने अभ्यास करता येतो. विद्यापीठाच्या या ब्लेंडेड अभ्यासक्रमाला ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठाचे सहकार्य मिळाले आहे. या पदवीची गुणवत्ता मेलबर्न विद्यापीठ आश्वासित करणार असल्यामुळे ही पदवी जगभर त्या विद्यापीठाच्या पदवीशी समकक्ष मानली जाणार आहे. परदेशात विज्ञानविषयक उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी त्याचा खूप फायदा होऊ शकेल.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सला भविष्यात येणार डिमांड!​

'मास्टर ऑफ डिझाइन' हा पदव्युत्तर अभ्यासक्रम दोन वर्षांचा आहे. बीई/बीटेक किंवा पाच वर्षांचा बी.आर्क. किंवा बी. डिझाइन किंवा फाईन आर्टस् ही पदवी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेला बसू शकतो. वस्तू, सेवा, संस्था आणि व्यवस्थांची सुयोग्य रचना निर्माण करणे ही एक बहुआयामी आणि आव्हानात्मक प्रक्रिया असते. एखादी रचना तयार करताना तिच्या वापरण्यातील सुलभता, कार्यक्षमता, वापरणाऱ्यांची मानसिकता, संस्कृती, सौंदर्य, किफायतशीरपणा अशा अनेक गोष्टींचे संतुलन साधावे लागते. त्यात अभिनवता आणावी लागते. अशा रचना निर्माण करण्याचे शिक्षण या अभ्यासक्रमात दिले जाईल. या अभ्यासक्रमात डिझाइनशी संबंधित विविध विषयांसोबतच प्रत्यक्ष आणि उद्योगस्नेही प्रकल्प; तसेच प्रशिक्षणावर भर देण्यात आला आहे. डिझाइनचे असे शिक्षण घेणाऱ्यांना अनेक प्रकारच्या व्यवसाय व उद्योगांमध्ये कारकीर्द घडविता येते. 

- १० ऑगस्ट २०२० पर्यंत प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. 
- प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. 
https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx
या अभ्यासक्रमांची आणखी माहिती वेबिनारद्वारे विद्यार्थ्यांना घेता येईल. 
- बी.ए.(लिबरल आर्ट्स) या अभ्यासक्रमाचे वेबिनार शनिवार दिनांक १ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ४ वाजता झूमद्वारे होणार आहे. 
- बी.एस्सी. ब्लेंडेड या अभ्यासक्रमाचे वेबिनार सोमवार दिनांक ३ ऑगस्ट २०२० रोजी तर 'मास्टर ऑफ डिझाईन' या अभ्यासक्रमाचे वेबिनार मंगळवार दिनांक ४ ऑगस्ट २०२० रोजी झूमद्वारे होणार आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savitribai Phule Pune University announced the process of entrance exams and online application for three courses