महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या अंगलट; खुलासा करण्याचा उच्च शिक्षण विभागाचा आदेश 

महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या अंगलट; खुलासा करण्याचा उच्च शिक्षण विभागाचा आदेश 

पुणे - राज्य शासनाची परवानगी नसतानाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परस्पर महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय अंगलट आला आहे. हा निर्णय कोणत्या नियमांच्या आधारावर घेतला, याचा खुलासा करण्याचा आदेश उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठाला दिला आहे. त्यामुळे 11 जानेवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय मागे घेण्याची नामुष्की विद्यापीठावर आली आहे. 

महाविद्यालये सुरू करावीत, अशी मागणी समोर आल्याने पुणे विद्यापीठाने यासाठी समिती नेमली. समितीच्या अहवालानुसार सुरक्षेच्या नियमांचे पालन करून 11 जानेवारीपासून प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता याच निर्णयामुळे खुलासा करण्याची नामुष्की विद्यापीठावर आली आहे. 

उच्च शिक्षण विभागाने याबाबत पुणे विद्यापीठाला गुरुवारी पत्र पाठवले आहे. त्यामध्ये राज्यातील अकृषी विद्यापीठांनी प्रत्यक्ष वर्ग हे "यूजीसी'ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार शासनाच्या मान्यतेने सुरू करणे आवश्‍यक होते. मात्र, पुणे विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकात 11 जानेवारीपासून प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले. राज्य शासनाने कोणतेही आदेश दिले नसताना थेट वर्ग सुरू करण्याचा निर्णय कोणत्या नियमांच्या आधारे घेतला, याचा खुलासा करा, असा आदेश उच्च शिक्षण संचालकांनी विद्यापीठाच्या कुलसचिवांनी दिला आहे. 

हे पत्र आल्यानंतर विद्यापीठाने सुधारित आदेश काढत महाविद्यालये सुरू करण्याची तारीख शासनाच्या आदेशानंतर कळविण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. 

अहवाल स्वीकारला; पण... 
पुणे विद्यापीठाने समितीचा अहवाल स्वीकारून 11 जानेवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला; पण त्याचवेळी कोरोनाच्या आपत्तीमुळे शासनाने महाविद्यालये बंद केली. ती सुरू करताना शासनाची परवानगी आवश्‍यक आहे हे विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळेच उच्च शिक्षण विभागाच्या पत्रानंतर एक पाऊल मागे घ्यावे लागले आहे. दरम्यान, याबाबत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. 

शासन निर्णय कधी घेणार? 
महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यापीठाला खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षणातील मर्यादा, प्रात्यक्षिक बंद असल्याने विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी थेट वर्ग सुरू करा, अशी मागणी होत आहे. शाळा सुरू झाली; पण महाविद्यालये सुरू झाली नाहीत. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे दुर्लक्ष का होत आहे, असा प्रश्‍न काही प्राचार्यांनी "सकाळ'शी बोलताना उपस्थित केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com