देशातला आतापर्यंतचा सर्वांत मोठा छापा; पुण्यात कोट्यवधींचा गुटखा जप्त

Police
Police

पुणे : राज्यात गुटखा बंदी असतानाही शहरात मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुणे पोलिसांनी दोन महिन्यात गुटखा विरोधी कडक कारवाई केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी थेट मुख्य गुटखा विक्रेत्याच्या गुजरात आणि दादर नगर हवेलीमधील कारखान्यावर छापा घालत तब्बल 15 कोटी रूपयांचा गुटखा आणि त्यासाठीचा कच्चा माल जप्त केला. 

राज्यात गुटखाबंदी आहे, असे असूनही त्याची शहरात विक्री सुरू होती. गुटख्यापासून कॅन्सरसारखे दुर्धर आजार होऊन आजारग्रस्त व्यक्तींचे कुटुंबातील लोकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी गुटखा विरोधी मोहीम सुरू केली होती. त्यामध्ये मागील दोन महिन्यात 28 ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा जप्त केला आहे. 

या गुन्ह्यातील आरोपींच्या चौकशी दरम्यान गुजरातमधील वापी आणि दादरा नगर हवेलीतील सिल्वासा येथे 'गोवा' या नावाने प्रतिबंधित गुटखा उत्पादन केले जात असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पुणे पोलिसांच्या युनिट चारच्या पथकाने सिल्वासा येथे 'काशी व्हेंचर्स' या कंपनीवर छापा टाकून 15 कोटींचा गुटखा आणि गुटखा बनविण्याचा कच्चा माल जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. याप्रकरणात गोवा गुटखाचे मालक आणि गुटखा किंग जे.एम.जोशी यांचा सहभाग निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

शहरातील गुटखा रॅकेटवर छापामारी सुरू करताना पोलिसांनी प्रारंभी चंदननगरहद्दीत 17 नोव्हेंबर रोजी सुरेश अग्रवाल, अक्षय अग्रवाल, आकाश अग्रवाल, प्रविण वाहुळ, निरज सिंगल यांचेवर गुन्हा दाखल करुन सात लाख 50 हजार रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा आणि वाहने जप्त केली. या गुन्ह्याचा तपास युनिट चारचे पथकाचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल करत असताना, तपासात प्रतिबंधीत गुटख्याच्या व्यवसायातून होणारी आर्थिक उलाढाल हवाला मार्फत होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी हवालाद्वारे व्यवहार करुन देणाऱ्या पाच ठिकाणांवर छापे टाकून सुमारे चार कोटी रुपये इतकी रक्कम जप्त केली. दोन जानेवारी रोजी पोलिसांनी वानवडी आणि हडपसर पोलिस ठाणे हद्दीत दोन ठिकाणी छापे टाकून 25 लाख रुपयांचा गुटखा आणि वाहने जप्त केली.

या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर, चौकशी दरम्यान अवैध गुटख्याचे उत्पादन आणि वितरण हे वापी (गुजरात) आणि सिल्वासा (दादर नगर हवेली) येथे अवैधरित्या होत असल्याची माहिती मिळाली. तेथून माल घेऊन चोरट्या मार्गाने त्याचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा अटक केलेल्या आरोपींच्या मार्फत होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, पोलिस उपायुक्त बच्चनसिंह यांचे मार्गदर्शनाखाली युनिट चारचे पोलिस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलिस अंमलदार राजस शेख, सचिन ढवळे, कौस्तुभ जाधव, शितल शिंदे यांच्या पथकाने वापी आणि सिल्वहासाला छापे टाकले.

गुटखा उद्योगावर झालेली देशातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई 

सिल्वसा येथे 'गोवा' या नावाने प्रतिबंधीत गुटखा उत्पादन करुन पुरवठा करणाऱ्या काशी व्हेंचर्स या कंपनीचा शोध घेण्यात आला. स्थानिक पोलिस, अन्न व औषध प्रशासन यांचे मदतीने कंपनीवर छापा टाकून गोवा गुटखा आणि तो बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल त्यात सुगंधी द्रव्य, तंबाखू, सुपारी, चुना, कात पावडर, कॅल्शियम क्रिस्टल, इलायची, ग्लिसरीन इ.पदार्थ आणि यंत्रसामुग्री जप्त करण्यात आली आहे. गोवा गुटखा उत्पादन करणाऱ्या फॅक्टरीचे मालक, चालक यांची नावे निष्पन्न झाली असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. काशी व्हेंचर्स या कंपनीवर टाकलेला छापा आणि जप्ती ही भारतातील गुटखा उद्योगावरील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी सांगितले.

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com