मोठी बातमी : अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो, बॅकलॉगचे वेळापत्रक बदलले!

ब्रिजमोहन पाटील
Sunday, 11 October 2020

पहिल्या दोन दिवसात सुमारे 1 लाख 36 हजार जणांनी सराव परीक्षा दिली. मात्र, रविवारी त्याची मुदत संपलेली असताना अद्यापही जवळपास 50 हजार विद्यार्थ्यांनी लॉगइन आणि सरावही केलेला नाही.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे लॉगइन, इमेल आयडी, तसेच सॉफ्टवेअरची चाचपणी करण्यासाठी सराव परीक्षा घेतली, पण तब्बल 50 हजार विद्यार्थ्यांनी लॉगइन केले नसल्याचे समोर आले आहे. अशा विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचे आव्हान विद्यापीठासमोर निर्माण झाले आहे. या गोंधळामुळे बॅकलॉगची परीक्षा 12 ऐवजी 13 ऑक्‍टोबरपासून सुरू केली जाणार आहे. 12 तारखेचा पेपर 17 तारखेला होणार असल्याचे विद्यापीठाने कळविले आहे.

MPSCची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर तज्ज्ञ, विद्यार्थी म्हणतात, असं वागणं बरं नव्हं!​

पुणे विद्यापीठातर्फे पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचे नियोजन केले आहे. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल च्वाइस क्वेश्‍चन - एमसीक्‍यू) पद्धतीने होणार आहे, त्यामुळे त्याचे स्वरूप कसे असेल हे जाणून घेण्यासाठी 8 ऑक्‍टोबर पासून सराव परीक्षा घेण्यास सुरवात केली. पुणे विद्यापीठाकडे नोंदणी केलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी सराव परीक्षेसाठी लॉगइन करावे, अशी अपेक्षा विद्यापीठाची होती, त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला पाच वेळा परीक्षा देण्याची संधीही दिली होती.

पहिल्या दोन दिवसात सुमारे 1 लाख 36 हजार जणांनी सराव परीक्षा दिली. मात्र, रविवारी त्याची मुदत संपलेली असताना अद्यापही जवळपास 50 हजार विद्यार्थ्यांनी लॉगइन आणि सरावही केलेला नाही. त्यामुळे बॅकलॉग विषयांची परीक्षा 12 ऐवजी 13 ऑक्‍टोबर रोजी घेतली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी लॉगइन केले नाही, अशांना सराव परीक्षा देण्यासाठी आणखी एक संधी 12 ऑक्‍टोबर रोजी उपलब्ध होणार आहे.

इंजिनिअरिंग, फार्मसीला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; ५० टक्के गुणांची अट रद्द​

परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, "सर्व विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा द्यावी असे अपेक्षित होते, पण जवळपास 50 हजार विद्यार्थ्यांनी ती दिलेली नाही. त्यांना आणखी एक संधी दिली आहे. बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांना वेळापत्रक बदलले आहे, त्यासाठीचा मेसेज मोबाईलवर केला आहे. तसेच संकेतस्थळावर सुधारित वेळापत्रक बघावे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savitribai Phule Pune University final year backlock subject schedule has changed