Breaking : 'अंतिम'च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार फेरपरीक्षा!

Students_Exam
Students_Exam

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेतील गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांना पूर्ण प्रश्‍न सोडवता आले नाहीत, काहींचे पेपर सबमीट झाले नाहीत. अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी विद्यापीठाकडे तक्रार केलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाणार आहे.

पुणे विद्यापीठाची पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा 12 ऑक्‍टोबरपासून सुरू झाली आहे. या ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षेत प्रश्‍नांचे सुमार दर्जाचे भाषांतर, प्रश्‍न किंवा उत्तरांचे पर्याय न दिसणे, फॉन्ट बदलल्याने प्रश्‍न वाचता न येणे, आचानक परीक्षा बंद होणे, लॉगइन न होणे, पेपर सबमीट न होणे अशा समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागले आहे. अनेकांना पेपर सोडवता आला नसल्याने नापास होण्याची भीती वाटत आहे. हा गोंधळ समोर आल्याने विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून गुगल फॉर्म भरून घेऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी नोंदवून घेण्यास सुरूवात केली. गुगल फॉर्ममधील समस्यांचे विश्‍लेषण करण्यासाठी एक उपकुलसचिव दर्जाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे पथक नियुक्त केले आहे.

विद्यापीठाकडे आत्तापर्यंत साडे तेरा हजार पेक्षा जास्त तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये जवळपास 8 हजार विद्यार्थ्यांनी त्यांचा पेपर सबमीट झाला नाही, अशी तक्रार केली आहे. त्याचसह प्रश्‍न चुकीचे येणे, मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून पेपर न दिसणे, लॉगइन न होणे अशा प्रकारच्याही तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. एकाही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ द्यायचे नाही, अशी भूमिका विद्यीपाठाने घेतली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा 1 ते 5 नोव्हेंबर या महिन्यात पार पडणार आहे. याबाबत लवकरच वेळापत्रक जाहीर होईल, असे सूत्रांनी सांगितले.

ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत अडचणी आल्या आहेत, त्यांनी www.unipune.ac.in या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन तेथील गुगल फॉर्ममध्ये त्यांच्या समस्या नोंदवाव्यात.

50 मिनटे सोडवलेला पेपर ग्राह्य
ऑनलाइन परीक्षा देताना आचानक तांत्रिक समस्या येऊन परीक्षा थांबल्याची घटना घडल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी ज्यांनी 50 मिनिटांपेक्षा जास्त वेळ पेपर सोडवला आहे किंवा 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त प्रश्‍न सोडविले आहेत, अशी विद्यार्थ्यांची परीक्षा ग्राह्य धरली जाणार असून, त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची गरज पडू नये, याबाबत विद्यापीठ विचार करत आहे.

शुक्रवारी झालेल्या परीक्षेची अकडेवारी
ऑनलाइन परीक्षेसाठी अपेक्षीत - 72394
परीक्षा देणारे - 72680
ऑफलाइनऐवजी ऑनलाइन परीक्षा देणारे - 286
ऑफलाइनसाठी अपेक्षीत - 18724
परीक्षा देणारे - 13547

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com