Big Breaking : पुणे विद्यापीठ निर्णयावर ठाम; परीक्षा 'एमसीक्‍यू'नेच होणार!

ब्रिजमोहन पाटील
Wednesday, 9 September 2020

अंतिम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांचे आधीच्या वर्षाचे/ सत्राचे विषय बॅकलॉग राहिले आहेत, त्यांची परीक्षा 1 ऑक्‍टोबर ते 9 ऑक्‍टोबर या कालावधीत एका तासाची एमसीक्‍यू पद्धतीने होईल.​

पुणे : सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही बहुपर्यायी प्रश्‍नाद्वारेच (मल्टिपल च्वाइस कोश्‍चन) होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देणे शक्‍य होणार नाही, त्यासाठी ऑफलाईन परीक्षा घेतली जाईल. 'एमसीक्‍यू' परीक्षा असेल तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यापद्धतीने प्रश्‍नपत्रिका असेल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
परीक्षेच्या आयोजनासंदर्भात पुणे विद्यापीठात परीक्षा मंडळाची बैठक झाली, त्यामध्ये अंतिम वर्ष/सत्र, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, बॅकलॉग यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून, त्याबाबत बुधवारी (ता.9) परीक्षा संचालक डॉ. महेश काकडे यांनी परिपत्रक काढण्यात आले आहे.

अरे बापरे! भंगारातून पुणे विद्यापीठाने केली तब्बल एवढी कमाई

अंतिम वर्ष/सत्राच्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा 10 ऑक्‍टोबर ते 30 ऑक्‍टोबर या कालावधीत ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीने एका तासाची 'एमसीक्‍यू' घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेसाठी सर्व व्यवस्था करून दिली जाणार आहे. प्रथम ऑनलाइन परीक्षा होईल, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांकडे परीक्षा देण्यासाठी स्मार्टफोन, इंटरनेट अशा तांत्रिक समस्या आहेत, त्यांच्यासाठी जवळच्या परीक्षा केंद्रावर ऑफलाईन 'एमसीक्‍यू' परीक्षा घेतली जाईल.

पहिल्या आठवड्यात बॅकलॉगची परीक्षा
अंतिम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांचे आधीच्या वर्षाचे/ सत्राचे विषय बॅकलॉग राहिले आहेत, त्यांची परीक्षा 1 ऑक्‍टोबर ते 9 ऑक्‍टोबर या कालावधीत एका तासाची एमसीक्‍यू पद्धतीने होईल. त्याचे वेळापत्रक विद्यापीठाकडून स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे.

गुंतवणुकीच्या आमिषाने पाऊण कोटींना घातला गंडा; १२ जणांवर गुन्हा दाखल​

ऑनलाईन तोंडी परीक्षा
अंतिम वर्षाच्या/सत्राच्या ज्या अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक, तोंडी, प्रकल्प किंवा चर्चासत्र परीक्षा यापूर्वी होऊ शकलेल्या नाहीत. त्यांची परीक्षा 15 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने होईल. त्यासाठी गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम, झूम, वेबएक्‍स, फोन यामाध्यमांचा वापर केला जाईल. या परीक्षांचे महाविद्यालयांना रेकॉर्डिंग जतन करून ठेवणे आवश्‍यक आहे. परीक्षेनंतर महाविद्यालयांनी 5 ऑक्‍टोबर पूर्वी विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर भरणे आवश्‍यक आहे.

पुण्यात ‘डबल डेकर’ पूल उभारण्यास महामेट्रोने केली सुरुवात

"जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घरी बसून ऑनलाइन परीक्षा द्यावी, पण ज्यांना तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे परीक्षा देणे शक्‍य नाही अशांसाठी ऑफलाईन परीक्षा घेतली जाईल. त्यासाठी जवळच्या परीक्षा केंद्रावर त्यांना जावे लागेल. विद्यार्थ्यांना शिकवलेला अभ्यासक्रम, त्यांना झालेले आकलन याचा विचार करून परीक्षा सोपी जाईल, त्यामुळे 'एमसीक्‍यू' पद्धतीला घाबरून जाऊ नये.''
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ

- परीक्षा कोणत्या पद्धतीने द्यायची याचा पर्याय विद्यार्थ्यांना निवडता येणार.
- सर्व परीक्षांचे अभ्यासक्रमनिहाय स्वतंत्रपणे वेळापत्रक जाहीर होईल.
- महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.

- प्रात्यक्षिक, तोंडी, प्रकल्प परीक्षा - 15 ते 25 सप्टेंबर
- बॅकलॉग परीक्षा - 1 ते 9 ऑक्‍टोबर
- नियमती परीक्षा - 10 ते 30 ऑक्‍टोबर

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savitribai Phule Pune University will conduct exams of final year students through MCQ