Sawai Gandharva 2019 : संगीताच्या विश्‍वात्म्याचं अनोखं दर्शन

ken zuckerman
ken zuckerman

Sawai Gandharva 2019 : पुणे - सरोदवर सिंध भैरवी रागात वाजणारी ती सुरावट ऐकून विश्वास बसत नव्हता, की वाजवणारा माणूस भारतीय नाही. संगीत कसं विश्वव्यापी आहे, याचंच हे बोलकं उदाहरण. मूळ स्वित्झर्लंडचे; परंतु भारतीय शास्त्रीय संगीतात लक्षणीय ठरलेल्या सरोद या वाद्यावर कमालीची हुकमत असल्याने प्रसिद्धीच्या झोतात आलेले केन झुकरमन यांची गुरुवारी झालेली मुलाखतही तेवढीच सुरेल होती.

ते म्हणाले, ‘‘१९७२ मध्ये उस्ताद अली अकबर खाँ यांचे सरोदवादन ऐकले. त्यापूर्वी सरोदबद्दल काहीच माहीत नव्हते. त्या वादनाने इतका प्रभावित झालो, की सदतीस वर्षांपासून त्यांच्याकडून सरोद शिकतो आहे. त्यांनी गुरुमंत्र दिला, की सरोद वाजवत आहोत, असे न वाटता ते गाते आहे, असेच वाटले पाहिजे. नवशिका होतो तेव्हा गुरुजींनी थेट वाद्य हातात देण्यापेक्षा सरगम, छोटा ख्याल व ध्रुपद आदी भरपूर ऐकायला लावले. नंतर राग काफी व यमन कल्याणपासून सुरुवात केली. गुरुजींच्या मैफिलीच्या निमित्ताने अनेकदा पुण्यात व इतर शहरांमध्ये भीमसेनजींना भेटता आले. माझ्या वादनाचे कौतुक करून ते असेही म्हणाले होते की, आमच्या संगीत महोत्सवात तुम्ही सरोदवादन करायला हवे.’’

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा अविभाज्य भाग असलेल्या ‘अंतरंग’ या संवादात्मक कार्यक्रमातून झुकरमन यांनी सरोदवादनाच्या ३७ वर्षांपासून घेतलेल्या ध्यासाची विस्मयकारक झलक थक्क करून गेली. संगीत अभ्यासक अमरेंद्र धनेश्वर यांनी त्यांना बोलते केले. आर्य संगीत मंडळातर्फे शिवाजीनगरमधील सवाई गंधर्व स्मारक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कार्यवाह श्रीनिवास जोशी यांनी स्वागत केले.

सुरुवातीला ‘षड्‌ज’अंतर्गत माहितीपट दाखविण्यात आले. सतारवादक पं. रविशंकर यांच्या कारकिर्दीचा वेध घेणारा ‘मोमेंट्‌स विथ द माइस्ट्रो’ (दिग्दर्शक ः प्रमोद पाटी), नंतर संतूर या वाद्यासंदर्भातील ‘म्युझिक ऑफ इंडिया’ व नृत्यविषयक भरतनाट्यम (दिग्दर्शक ः मधू बोस) या माहितीपटांचा आस्वाद प्रेक्षकांनी घेतला. आज या उपक्रमांचा दुसरा दिवस होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com