सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात किराणा घराण्याचे गायक संदीप भट्टाचार्य यांच्या गायनाने झाली. ‘किराणा’ हे जरी एक घराणे असले तरीदेखील या घराण्यात मूळ दोन गायन परंपरा आढळतात. अब्दुल करीम खान साहेब किराणा घराण्याचे अध्वर्यू म्हणून सर्वांना परिचित आहेतच. ते स्वतः बीनकार देखील होते. वीणेतील तंतुकामाचा प्रभाव त्यांच्या परंपरेत जाणवतो. त्यांचेच चुलते अब्दुल वहिद खान हे सारंगीवादक होते. त्यांच्या परंपरेतील किराना घराण्याच्या गायनात सारंगीचे अंग जाणवते.
मनोज आणि मोरमुकुट केडिया यांनी सतार-सरोद सहवादन प्रस्तुत केले. त्यांच्या वादनात जुगलबंदी आणि लयीच्या कामावर अधिक भर होता. त्यांनी निवडलेला ‘झिंझोटी’ हा राग गणिती वादनापेक्षा भावप्रद वादनासाठी अधिक पोषक आहे. दोन्ही वादकांचे सहवादन तबल्यावर सत्यजित तळवलकर यांनी केलेल्या उत्स्फूर्त साथीमुळे रंजक ठरले.
यानंतर जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका श्रीमती मंजिरी आलेगावकर यांनी ‘जैत’ आणि ‘श्री’ या दोन रागांच्या संयोगातून बनलेला जैतश्री हा जोड राग सादर केला. त्यानंतर त्यांनी राग नंद सादर केला. ‘राजन अब तो आजा रे’ या द्रुत बंदिशीतून कुमार गंधर्वांच्या गायकीचा श्रोत्यांना अनुभव देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपल्या गायनाची सांगता त्यांनी ‘हिरना समझ बूझ बन चरना’ या निर्गुणी भजनाने केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.