Video : ऑक्‍सिजन पुरविणाऱ्या मशिनसह हजेरी

बालेवाडीमधून सवाई महोत्सवात ऑक्‍सिजन मास्क लावून आलेल्या पूजा महेश कुंभार.
बालेवाडीमधून सवाई महोत्सवात ऑक्‍सिजन मास्क लावून आलेल्या पूजा महेश कुंभार.

स्वरांची मोहिनी माणसाला नेहमीच खेचून घेते; पण अनेकांना आश्‍चर्य करायला लावणारे याचे एक उदाहरण आज सवाईमध्ये पाहायला मिळाले. एनसीएलमध्ये टेक्‍निकल ऑफिसर म्हणून कार्यरत असणाऱ्या पूजा महेश कुंभार या स्वरांच्या ओढीने सवाईसाठी आल्या, त्याही नाकाला नळी आणि ऑक्‍सिजन पुरविणारे मशिन घेऊन. त्यांना सातत्याने ऑक्‍सिजनची गरज भासते. त्यामुळे त्याचे मशिन घेऊन त्या आल्या आणि पती समवेत त्यांनी या स्वरोत्सवाचा पूर्णवेळ रसास्वाद घेतला. 

त्या म्हणाल्या, ‘मी यापूर्वीदेखील सवाईत येण्यासाठी प्रयत्न केला; पण माझ्या त्रासाचा इतरांना त्रास होऊ नये म्हणून मी स्वत:ला या आनंदापासून वंचित ठेवले. यापुढे मी येत राहणार आहे. शास्त्रीय संगीताचा अनुभव खूप सुंदर आहे. शब्दांत त्याचे वर्णन करता येणार नाही. खूप मन:शांती अनुभवते आहे.’

मुलतानीची दाद सुखावणारी - ओंकारनाथ
‘गेल्या तीस वर्षांपासून मला ‘मुलतानी’चा सहवास आहे. या काळात हा राग मला जरासा समजलाय. त्यातून जेवढं मिळालं, उमगलं ते आज मांडण्याचा प्रयत्न केला,’’ अशी भावना तरुण गायक ओंकारनाथ हवालदार यांनी केले.

सवाईच्या चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातील सादरीकरणानंतर ते ‘सकाळ’शी बोलत होते. त्यांनी आळवलेल्या मुलतानीला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. याबद्दल ते म्हणतात, ‘‘पं. भीमसेन जोशी यांनी सवाई हे जगन्मान्य व्यासपीठ तयार केले आहे. त्यामुळेच चांगल्या रसिकांसमोर जाण्याची संधी आम्हा तरुणांना मिळते. आज रसिकांनी दिलेली दाद अप्रतिम होती. तसेच जबाबदारीची जाणीव करून देणारीदेखील होती. त्यामुळे अधिक रियाज करण्याची आस लागली आहे.’’ 

‘आमच्या किराणा घराण्याबरोबच जयपूर आणि आग्रा घराण्याचीही तालीम घेतली आहे. गायनामध्ये या दोन्ही घराण्यांच्या शैलीचा विशेषतः तानकारीचा मिलाफ करण्याचा प्रयत्न मी केला आणि तो रसिकांना खूप भावला याचा विशेष आनंद आहे,’’ असे ते म्हणाले.

आज सवाईमध्ये
अतुल खांडेकर (गायन), चंद्रशेखर वझे (गायन), रुचिरा केदार (गायन), नीलाद्रीकुमार (सतार), पं. उपेंद्र भट (गायन), पं. अजय चक्रवर्ती (गायन), डॉ. प्रभा अत्रे (गायन).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com