शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विद्यार्थ्यांची सरशी

Scholarship
Scholarship

पुणे - राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शहरी विद्यार्थ्यांवर मात केली आहे. राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या निकालात ग्रामीण भागातील ७ हजार ८९३, तर शहरी भागातील तीन हजार ७८९ विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

परीक्षा परिषदेने गेल्या वर्षी ९ डिसेंबरला आठवीतील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली. राज्यातील एक लाख १२ हजार ७५१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यातील ५२ हजार १४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रासाठी शिष्यवृत्तीचा कोटा ११ हजार ६८२ विद्यार्थ्यांसाठी निश्‍चित करण्यात आला आहे. तेवढ्याच पात्र विद्यार्थ्यांना दहमहा एक हजार रुपये याप्रमाणे वार्षिक १२ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांना ही रक्कम बारावीपर्यंत मिळते. 

परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे म्हणाले, ‘‘राज्य परीक्षेच्या संकेतस्थळावर निकाल देण्यात आला आहे. निकालासह निवड ही परिषदेच्या संकेतस्थळावरच दिली जात असल्याने शाळा आणि विद्यार्थ्यांना निकाल त्यावरून डाउनलोड करता येईल.’’ 

ग्रामीण भाग आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या यशातील तफावत का, याबद्दल परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रेय जगताप म्हणाले, ‘‘ग्रामीण भागामध्ये आजही शिष्यवृत्ती परीक्षा या प्रतिष्ठेच्या मानल्या जातात, त्यामुळे पालक आणि शिक्षक त्याबद्दल जागरूक असल्याने या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे. मुलांनी परीक्षेत यश मिळवावे म्हणून ग्रामीण भागातील शिक्षकही अधिक कष्ट घेतात, त्यामुळे हा फरक दिसतो आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com