School Student : ‘टाइम’ द्या; ‘स्क्रीन टाइम’ टाळा! तज्ज्ञांचा पालकांना सल्ला

शालेय विद्यार्थ्यांकडून आपल्यापेक्षा लहान किंवा शांत मुलांवर ‘दादागिरी’ करण्याच्या घटना सर्रास घडताना दिसतात.
School Student
School Studentsakal

पुणे - शालेय विद्यार्थ्यांकडून आपल्यापेक्षा लहान किंवा शांत मुलांवर ‘दादागिरी’ करण्याच्या घटना सर्रास घडताना दिसतात. अशातच आता विद्यार्थ्यांनी एका अल्पवयीन मुलावर चाकूने वार केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

त्यामुळे पालकांचा मुलांशी तुटत चाललेला सुसंवाद, तंत्रज्ञानाचा गैरवापर, वाढता स्क्रीन टाइम, चुकीच्या गोष्टींचे अनुकरण, आभासी जगातील वाढता वावर, परिणामी त्याचा मुलांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम आणि त्याचे उमटणारे पडसाद हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अल्पवयीन मुलांमधील क्रूरता किंवा हिंसाचाराची प्रवृत्ती वाढत असल्याने पालक, शाळा आणि ओघाने समाजाच्या आत्मपरीक्षणाची गरज पुढे येत आहे. मुलांचे आचरण, वर्तनाला समोरच्याला जबाबदार धरून चालणार नाही. नोकरी, व्यवसायामुळे मुलांसाठी पुरेसा वेळ मिळत नाही, हे कारण पालकांकडून सांगण्यात येते. परंतु मुलांच्या जडणघडणीत आपलाच सर्वाधिक वाटा आहे, हे मात्र आपण ‘पालक’ म्हणून सोईस्कररीत्या विसरत चाललोय का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

पालकांनो, विचार करा !

घरी असताना आपण किती वेळ मुलांना देतो, की आपला स्वत:चाच स्क्रीन टाईम सर्वाधिक असतो? आपल्याला ‘स्क्रीन टाईम’साठी पुरेसा अवधी मिळावा, म्हणून आपण मुलांचाही स्क्रीन टाइम वाढवत आहोत का? हे पालकांनी पाहावे. घरातील वातावरण मनमोकळे, सुसंवादी, दिवसभरातील गोष्टी एकमेकांना सांगणे, मुलांसोबत खेळणे, त्यांचे ऐकून घेणे, त्यांचे भावविश्‍व समजून घेणे अशाप्रकारे मुलांसोबत गुणात्मक वेळ घालविण्यासाठी आपण वेळ खर्ची घालतो का? याचा विचार पालकांनी करणे गरजेचे आहे. मुलांच्या मनातील भावना समजून घेत, त्यांच्या मनातील गैरसमज, नकारात्मक, नैराश्य, ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.

शिक्षकांनो, इकडे लक्ष द्या !

पूर्वीच्या काळात शिक्षकांविषयी आदरयुक्त भीती असायची. विद्यार्थी-शिक्षकांमध्ये आपुलकीचे गुरू-शिष्य परंपरेप्रमाणे नाते असायचे. म्हणूनच या नात्यात आदर हा सर्वाधिक आणि नितांत श्रेष्ठ असायचा. परंतु, आजकाल शिक्षणात नव्हे तर शिकविण्याच्या पद्धतीत झालेल्या बदलांमुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं काहीसे सैल झाल्याचे वास्तव नाकारता येत नाही.

खरंतर आई-बाबांनंतर लहान मुलांसाठी आदर्शवत असतो तो ‘शिक्षक’. शिक्षक म्हणून हा आदर्श आज कायम राखण्यात शिक्षक यशस्वी ठरत आहेत का, याचेही आत्मपरिक्षण करण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.

साधारणत: १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होतात. तेव्हा त्यांच्यातील भावनांमध्येही चढ-उतार होतो, हे पालक व शिक्षकांनी समजून घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधायला हवा. योग्यवयात मुलांना भावनिक आधार देऊन समजून सांगणे गरजेचे आहे. पालक आणि शिक्षकांनी मुलांचे वेळोवेळी समुपदेशन करावे.

- डॉ. अमृता ओक, विभागप्रमुख, मानसशास्त्र विभाग, मॉडर्न महाविद्याल, शिवाजीनगर

मुलांचा आभासी जगातील वावर वाढला आहे. परिणामी स्थिरता, संयम सुटत चालला आहे. मुलांच्या जडणघडणीत पालकांचा समसमान वाटा आहे. पालकांच्या माध्यमातून आणि शिक्षणातून मुलांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि सामाजिक विकास होणे आवश्यक आहे. मुलांची वयानुसार आकलनशक्ती समजून घ्यायला हवी.

- प्रा. चेतन दिवाण, सहाय्यक प्राध्यापक, कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस

उपाय काय....

पालकांसाठी

  • मुलांसमवेत सातत्याने सुसंवाद साधावा

  • मुलांच्या मित्र परिवाराची चौकशी करावी

  • मुलांच्या मनातील गैरसमज दूर करावेत

  • चांगले-वाइटाची जाणीव मुलांना करून द्यावी

  • मुलांनी विचारलेले प्रश्न टाळू नका

  • मुलांच्या मनातील शंकांचे निरसन करा

  • स्क्रीन टाइम कमी करा

  • गुणात्मक वेळ मुलांसाठी द्या

शिक्षक/शाळांसाठी...

  • शिक्षकांनी मुलांसमवेत संवाद साधावा

  • मूल्यशिक्षणाची बीजे रुजवावीत

  • मुलांच्या संशयास्पद हालचालींबाबत पालकांना कल्पना द्यावी

  • गैरसमज दूर करावेत

  • शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे

  • मुलांसमोर चांगले आदर्श ठेवावेत

  • शाळांमध्ये समुपदेशकांच्या साह्याने मार्गदर्शन करावे

काय आहेत कारणे

  • कौंटुबिक भांडणे, वाद

  • पाल्य-पालक यांच्यातील सुसंवादाचा अभाव

  • झटपट गोष्टी (पैसा, प्रसिद्धी, नाव) मिळविण्याची ओढ

  • चित्रपट, सोशल मिडियावरील गुन्हेगारीचे वाढते उदात्तीकरण

  • चुकीची संगत आणि चुकीच्या गोष्टींचे अनुकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com