शाळेतला शिक्षकच विद्यार्थी मुलींवर करायचा लैंगिक अत्याचार

जनार्दन दांडगे
गुरुवार, 16 मे 2019

शिक्षक विक्रम पोतदार याच्याकडून मुलींच्याबरोबर अश्र्लील चाळे व लैंगिक अत्याचार चा वरील धक्कादायक प्रकार मागील सहा महिण्यापासून सुरु होता.

लोणी काळभोर : लोहगाव (ता. हवेली) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील एका पदवीधर शिक्षकाने, आपल्याच शाळेत शिक्षण घेत असलेल्या तब्बल बारा अल्पवयीन मुलींच्याबरोबर अश्र्लील चाळे व लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विक्रम शंकर पोतदार (वय- 42, रा. लोहगाव ता. हवेली) या नराधम शिक्षकाच्या विरोधात विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार विमानतळ पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 15) रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पोलिसांनी विक्रम पोतदार यास अटक केली असल्याची माहिती विमानतळ पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक चित्रा चौधरी यांनी दिली.

दरम्यान विक्रम पोतदार याच्याकडून मुलींच्याबरोबर अश्र्लील चाळे व लैंगिक अत्याचार चा वरील धक्कादायक प्रकार मागील सहा महिण्यापासून सुरु होता. विक्रम पोतदार आपले गैरकृत्य उघडकीस येऊ नये मुलींना जिवे मारण्याची धमकी देण्याबरोबरच, लोहगाव परीसरातील एका स्थानिक राजकीय नेत्याच्या मार्फत शाळेचे मुख्याधापक व केंद्रप्रमुख यांच्याशी सेंटींगही केली होती. मात्र लोहगाव परीसरातील एका नागरीकाने 'सकाळ'शी संपर्क साधून, 'सकाळ' प्रतिनिधीला विक्रम पोतदार याच्या निच कृत्याची माहिती दिल्याने वरील प्रकरणाला वाचा फुटली. 'सकाळ'मध्ये शनिवारी (ता. 11) ला वरील विषयासंदर्भात वृत्त प्रसिध्द झाल्यावर, जिल्हा परीषदेचे शिक्षण अधिकारी (प्राथमिक) सुनिल कऱ्हाडे यांनी दिलेल्या आदेशानुसार करण्यात आलेल्या चौकशीत विक्रम पोतदार याने तब्बल बारा मुलींच्या बरोबर अश्र्लील चाळे व लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम पोतदार हा लोहगाव येथील जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेत पदवीधर शिक्षक म्हणुन काम करतो. मागिल सहा महिण्यापासून शाळेच्या जेवणासाठीच्या मधल्या सुट्टीत विक्रम पोतदार शाळेच्या खोलीत मुलींना एकएकटी गाठून, त्यांच्या समवेत अश्र्लील चाळे व लैंगिक अत्याचार करत होता. अश्र्लील चाळे व लैंगिक अत्याचार केल्यावर, कोणालाही कळु नये यासाठी मुलींना धमकवण्याबरोबरच जिवे मारण्याची धमकी ही देत होता. सहा महिण्याच्या कालावधीत तबब्ल बारा मुलींच्या बरोबर अश्र्लील चाळे व लैंगिक अत्याचाराचे प्रकार होऊनही, पोतदार याच्या भितीमुळे मुली घडलेल्या प्रकाराबाबत पालकांशी अथवा शाळेतील इतर शिक्षकांना सांगण्यास धजावत नव्हत्या. मात्र दोन महिण्यापुर्वी मधल्या सुट्टीत शाळेच्या एका कोपऱ्यात दोन मुली रडत असल्याची बाब शाळेतील एका शिक्षकाच्या लक्षात आल्याने पोतदार याचे बिंग फुटले. 

अशी फुटली वाचा...
विक्रम पोतदार याच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या दोन मुली मार्च महिण्याच्या दुसऱ्या आठवड्यात शाळेच्या मधल्या सुट्टीत, एका कोपऱ्यात दोन मुली रडत असल्याची बाब शाळेतील एका शिक्षकाच्या लक्षात आली. संबधित शिक्षकाने मुली रडत असल्याची बाब शाळेतील इतर शिक्षकांच्या लक्षात आणून देत, शाळेतील कांही महिला शिक्षकांना संबधित मुलींच्याकडे रडण्याबाबतची कारणे विचारण्यास सांगितले. त्यानुसार महिला शिक्षकांनी रडणाऱ्या दोन मुलींच्याकडे विचारपुस केली असता, विक्रम पोतदार यांने केलेल्या कृत्याची माहिती पुढे आली. विक्रम पोतदार याने केलेला प्रकार गंभीर असल्याने, मुलींच्याकडे विचारपुस करणाऱ्या शिक्षकांनी घडलेल्या घटनेबाबत शाळेचे मुख्याध्यापक शत्रुघ्न धोत्रे यांना माहिती दिली. तर धोत्रे यांनी वरील बाब केंद्रप्रमुख विजय पवार यांना माहिती दिली. दरम्यान बिंग फुटल्याचे विक्रम पोतदार यास समजताच, त्याने लोहगाव परीसरातील एका राजकीय नेत्याशी संपर्क साधून वरील बाब मिटवण्याची विनंती केली. यावर केंद्र प्रमुख विजय पवार व मुख्याध्यापक शत्रुघ्न धोत्रे यांनी दुसऱ्या दिवशी शिक्षकांची व विक्रम पोतदार यांची बैठक बोलावून, पोतदार याने मुलींना अभ्यास केला म्हणून शिक्षा केल्याने रडत असल्याचे सांगत घडलेल्या प्रकरणावर पडदा टाकण्याची विनंती केली. तसा अहवालही वरीष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून दिला. मात्र लोहगाव परीरातील एका जागरुक नागरीकांने तीन मुलींच्याबरोबर विक्रम पोतदार याने मुलींच्याबरोबर अश्र्लील चाळे व लैंगिक अत्याचार केल्याची माहिती सकाळ प्रतिनीधीला दिली. याबाबतची बातमी प्रसिध्द होताच, शिक्षण विभागाने शाळेत शिक्षण घेणार्या मुलींच्या घरी जाऊन विचारपुस केल्यानंतर, विक्रम पोतदार याने तीन नव्हे तर बारा मुलींच्याबरोबर अश्र्लील चाळे व लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब पुढे आली. 

केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक हे दोघेही दोषी, दोघांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी पालकांची मागणी -
दरम्यान विक्रम पोतदार हा मुलींच्या बरोबर करत असलेल्या गैरकृत्याची माहिती लोहगाव शाळेचे मुख्याध्यापक शत्रुघ्न धोत्रे व केंद्र प्रमुख विजय पवार यांना दोन महिण्यापुर्वी मिळाली होती. मात्र एका स्थानिक राजकीय पुढाऱ्याच्या दबावामुळे व विक्रम पवार याच्याशी असलेल्या जवळकीमुळे शत्रुघ्न धोत्रे व विजय पवार या दोघांनीही गंभीर प्रकरण दडपून टाकले. वरीष्ठ अधिकाऱ्यांना खोटा अहवाल पाठवून, वरीष्ठ अधिकाऱ्यांनाही अंधारात ठेवले. यामुळे विक्रम पोतदार याच्याबरोबरच वरील प्रकरणात 
केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक हे दोघेही पोतदार एवढेच दोषी आहेत. वरील दोघांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बारापैकी तीन मुलींच्या पालकांनी 'सकाळ'शी बोलतांना केली आहे. याबाबत प्रतिक्रीया घेण्यासाठी शत्रुघ्न धोत्रे व विजय पवार यांना प्रत्येकी तीन वेळा मोबाईल फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनीही मोबाईल फोन घेतला नाही. 

केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक या दोघांच्यावरही कारवाई होणार - गटशिक्षण अधिकारी रामदास वालझडे

याबाबत अधिक माहिती देतांना हवेली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी रामचंद्र वालझडे म्हणाले, विक्रम पोतदार याने बारा अल्पवयीन मुलींच्याबरोबर अश्र्लील चाळे व लैंगिक अत्याचार केल्याबाबतची पुर्ण माहिती केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक या दोघांना असतानाही, त्यांनी बोगस अहवाल पाठवुन प्रशासनाची दिशाभुल केल्याचे प्राथमिक चौकशीत आढळुन आले आहे. सकाळ मध्ये शनिवारी बातमी आल्यानंतर, जिल्हा परीषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी सुनिल कुऱ्हाड़े यांनी नव्याने चौकशी अधिकारी नेमल्यावर, विक्रम पोतदार याने केलेले कृत्य व त्याबाबत केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक या दोघांची संशयित भुमिका समजली आहे. विक्रम पोतदार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन, केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक या दोघांच्यावरही कायदेशिर कारवाई करण्याबाबत पोलिसांना पत्र देण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The school teacher was conducting sexual harassment on girl students at loni kalbhor